काशीमीरात रस्त्याकडेला १०० ते २०० ब्लँक आधार कार्डे आढळल्याने खळबळ

काशीमीरात रस्त्याकडेला १०० ते २०० ब्लँक आधार कार्डे आढळल्याने खळबळ

निवडणुकीपूर्वी गैरवापराचा संशय; तातडीच्या चौकशीची मागणी

 

प्रमोद देठे – मीरा-भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असताना, काशीमिरा परिसरात रस्त्याच्या कडेला तब्बल १०० ते २०० ब्लँक (रिकामी) आधार कार्डे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याबाबतचा विडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात आधार कार्डे सापडल्याने या प्रकरणामागे गंभीर गैरप्रकाराचा संशय व्यक्त केला जात आहे.

आधार कार्ड हा नागरिकांची ओळख, निवडणूक प्रक्रियेसह विविध शासकीय योजनांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. अशा परिस्थितीत ब्लँक आधार कार्डांचा साठा रस्त्यावर आढळणे ही बाब चिंताजनक असून, या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट ओळखपत्रे तयार करण्याचा किंवा निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असून, संबंधित प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आधार कार्डे येथे कशी आली, ती कुणाची आहेत, तसेच यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्यास मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *