मिरा-भाईंदरवर भगवाच फडकणार’; एकनाथ शिंदेंकडून निवडणुकीचे रणशिंग

 

 

मिरा-भाईंदर : आगामी मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेनेने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मिरा रोड येथील शिवार गार्डनमध्ये आयोजित ‘पदाधिकारी निर्धार मेळाव्या’त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट निवडणुकीचे रणशिंग फुंकत, “मिरा-भाईंदरवर यंदा महायुतीचा भगवा फडकवणार,” असा निर्धार व्यक्त केला.

 

या मेळाव्यास राज्य परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक प्रमुख उपस्थित होते. शिवसैनिकांची मोठी गर्दी आणि उत्साहामुळे मेळाव्याने राजकीय रंगत वाढवली.

 

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “गेल्या दहा-बारा वर्षांत मिरा-भाईंदरचा चेहरामोहरा बदलला आहे. हा विकास प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शक्य झाला. आम्हाला सत्तेचा मोह नाही, तर शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.” सरनाईक यांच्या नेतृत्वावर त्यांनी स्पष्टपणे शिक्कामोर्तब केले.

 

शिवसेना हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे अधोरेखित करत शिंदे यांनी, “जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करतो, तोच पुढे जातो. सर्वांनी एकजुटीने काम करून महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे,” असे आवाहन केले.

 

निवडणूक समीकरणांबाबत बोलताना शिंदे यांनी, मिरा-भाईंदरमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून, याबाबत अंतिम निर्णय लवकरच होईल, असे स्पष्ट केले.

 

दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “मिरा-भाईंदरची जनता हेच माझे कुटुंब आहे. गेल्या १५ वर्षांत जनतेच्या विश्वासातूनच मी काम करत आलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाच्या नव्या टप्प्यावर पोहोचले आहे. आगामी निवडणुकीत ‘बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा’ महापालिकेवर फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे.”

 

या मेळाव्याने मिरा-भाईंदरमधील आगामी निवडणूक लढतीत शिवसेना–महायुती पूर्ण ताकदीने उतरल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *