सुशासनासाठी मतदानाची ताकद वापरा; मुंबईतून नव्या राजकारणाची सुरुवात – हार्दिक हुंडिया

 

मुंबई : देशात लोकशाही असल्यामुळे राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद नागरिकांच्या हातात आहे. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार योग्य पद्धतीने वापरून सुशासनाचे राजकारण प्रस्थापित करावे, असे आवाहन जनकल्याण पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडिया यांनी केले आहे.

कबुतरांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने बोलताना हुंडिया यांनी मूक प्राण्यांवरील अन्यायाकडे लक्ष वेधले. देशाच्या शांतीचे दूत म्हणून ओळखली जाणारी कबुतरे वेदनेने मरत असतील, तर ही बाब चिंताजनक असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मुंबईतच कबुतरांची समस्या का निर्माण झाली, याचे उत्तर राजकीय नेत्यांनी द्यावे,” असे त्यांनी सांगितले.

“पाच वर्षांतून एकदा मिळणारा मतदानाचा अधिकार ही मोठी ताकद आहे. ज्या व्यक्तीला आपण मत देतो, तो जनतेसाठी काम करतो की नाही, याची जबाबदारी मतदारांचीच असते,” असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षापेक्षा सुशासन महत्त्वाचे मानून उमेदवारांची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या शहराच्या हिताचा विचार करणारे लोक सत्तेत आले, तर बहुमत नसले तरीही प्रभावी प्रशासन शक्य आहे, असा विश्वास हुंडिया यांनी व्यक्त केला. सुशासनाचे राजकारण आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील नागरिकांनी जनकल्याण पार्टीत सहभागी होऊन सुशासनाच्या या प्रयत्नांना बळ द्यावे आणि या उदात्त कार्याची सुरुवात मुंबईतून करावी, असे आवाहन हार्दिक हुंडिया यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *