दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर अभिनयातून ब्रेक घेतला होता. मात्र, ऋषी कपूर यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी करण जोहरच्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातून पुनरागमन केले. नीतू कपूर या मुलगी रिद्धिमा कपूरसह नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ (Fabulous Lives of Bollywood Wives) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीझनमध्ये दिसल्या. एका एपिसोडमध्ये त्यांनी परत काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे पतीच्या निधनाला सामोरे जाण्यासाठी कशी मदत झाली यावर वक्तव्य केले आहे. ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’मध्ये रिद्धिमा कपूरबरोबर बोलताना नीतू कपूर यांनी म्हटले, “तुझ्या वडिलांच्या निधनानंतर मी काम करायला तयार नव्हते. ट्रोल्स कसे असतात, हे तुला माहीतच आहे. पण, तू आणि रणबीरने मला खूप पाठिंबा दिला. त्यानंतर मी एका शोमध्ये काम केले. काही जाहिरातींमध्येही काम केले; पण कामावर जाण्याआधी मी थरथरत असे. गेली काही वर्षं माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होती. गेल्या वर्षापर्यंत मला ठीक वाटत नव्हते. जर मी घरी राहिले आणि काहीच केले नाही, तर मला वेड लागले असते”, अशा प्रकारे नीतू कपूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नीतू कपूर यांनी याआधी ‘बॉलीवूड हंगामा‘ला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर मी संपूर्ण आत्मविश्वास गमावला होता, असे वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते, “‘जुग जुग जियो’ चित्रपटात काम करण्याआधी माझा आत्मविश्वास शून्य होता. माझ्या पतीचे निधन झाले होते. मी तो चित्रपट माझ्यासाठी करीत होते. ज्यावेळी मी चंदिगडला एकटी गेली. त्यावेळीदेखील माझ्याकडे आत्मविश्वास नव्हता. हळूहळू मी स्वत:वर काम केले. आजही मी स्वत:ला तयार करीत आहे. माझ्या पतीच्या निधनानंतर माझे आयुष्य कुठे जाईल ते मला माहीत नव्हते. मी जर काम करण्याचा निर्णय घेतला नसता, तर मी त्या धक्क्यातून पूर्णपणे बाहेर येऊ शकले असते की नाही, हे मला माहीत नाही.” नीतू कपूर यांना रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर अशी दोन मुले आहेत. कामाच्या बाबतीत बोलायचे, तर त्या लवकरच ‘लेटर्स टू मिस्टर खन्ना’ (Letters to Mr. Khanna) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामध्ये सनी कौशल प्रमुख भूमिकेत असणार आहे.