“संस्कृती आर्ट फेस्टीव्हल २०२५” ची ‘शान’दार सुरुवात मिरा भाईंदरमध्ये कलेचा, एकतेचा आणि सर्जनशीलतेचा महाउत्सव

 

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर शहरात सांस्कृतिक वैभवाचा नवा अध्याय आज लिहिला गेला. प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे आयोजित ‘संस्कृती आर्ट फेस्टिव्हल २०२५’ चा भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान, भाईंदर पूर्व येथे पार पडला. विविध धर्म, विविध समाजातील नागरिकांनी हातात हात घालून काढलेल्या सांस्कृतिक रॅलीने या महोत्सवाची सुरुवात झाली. सामाजिक सलोखा, एकात्मता आणि सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
“संस्कृती आर्ट फेस्टिवल २०२५” ची मुख्य विषय म्हणजे ‘स्वप्नातील मीरा -भाईंदर’ आणि याच मीरा -भाईंदर शहरात गेल्या काही वर्षात झालेल्या विकासकामांची सुंदर सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट रांगोळ्यांचे प्रदर्शन या भव्य फेस्टिवलमधला सर्वात महत्वाचा पैलू आहे. तसेच रामनगरी अयोध्यभूमीत प्रभू श्री रामाच्या मंदिरावर फडकविण्यात आलेल्या भव्यदिव्य अशा भगव्या झेंड्यासोबत राममंदिराची सुंदर अशी प्रतिकृती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असे पुतळा आलेल्या तमाम रसिकांसाठी फेस्टिव्हलचा आकर्षक बिंदू ठरत आहे.


फेस्टिव्हलच्या पहिल्याचं संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक शान मुखर्जी यांच्या सुरेल मैफलीने मिरा भाईंदरकरांची मनं अक्षरशः जिंकून घेतली. बॉलीवूडमधील त्यांच्या सदाबहार गीतांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले. रसिकांनी गाण्यांवर ताल धरत, संगीताच्या लयीत हरवून गेलेली ही संध्याकाळ दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरली.
संस्कृती आर्ट फेस्टिव्हल १२ डिसेंबर पासून १५ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, दररोज कला, संगीत, नृत्य, नाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.


मिरा भाईंदरचा प्रत्येक कोपरा उत्सव, ऊर्जा आणि उत्कर्षाच्या प्रकाशाने उजळून निघाला असून, हा महोत्सव शहराच्या सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्णपान म्हणून नोंदला जाईल, यात शंका नाही.
या कार्यक्रमाला मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक आणि महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “संस्कृती आर्ट फेस्टिव्हल हा केवळ एक उत्सव नसून, मिरा भाईंदरच्या स्वप्नांची, प्रगतीची आणि सर्जनशील शक्तीची भव्य अभिव्यक्ती आहे. कला, संगीत आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठाण्याप्रमाणेच मिरा भाईंदरचीही एक स्वतंत्र, समृद्ध सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी, हा माझा मनापासूनचा संकल्प आहे.”
तर आपल्या भावना व्यक्त करताना गायक शान मुखर्जी म्हणाले की, “मिरा भाईंदरच्या रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद अतिशय ऊर्जादायी आहे. इथली माणसं मनापासून संगीतावर प्रेम करतात. ‘संस्कृती आर्ट फेस्टिव्हल’सारखा उपक्रम कलाकारांसाठीही प्रेरणादायी आहे. या मंचावर गायला मिळणं, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *