किल्ले रायगड प्रदक्षिणा २०२५ : राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा युथ क्लब महाडतर्फे २८ डिसेंबरला भव्य आयोजन; एक हजारांहून अधिक सहभागींचा संकल्प

 

महाड ( प्रतिनिधी) रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत आणि युथ क्लब महाड आयोजित राज्यस्तरीय ‘रायगड प्रदक्षिणा २०२५’ या निसर्गरम्य व शौर्यपूर्ण ट्रेकिंग उपक्रमाला यावर्षी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा युथ क्लबचे अध्यक्ष राजेश बुटाला यांनी व्यक्त केली आहे. रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता पाचाड (रायगड किल्ला पायथा) येथून प्रदक्षिणेची सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी सुमारे ८५० ट्रेकर्सनी सहभाग घेतल्यानंतर यंदा १ हजारांहून अधिक प्रदक्षिणार्थी सहभागी होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

रायगडाची प्रदक्षिणा हा केवळ ट्रेक नसून निसर्गरम्य दृश्यांचा, धबधब्यांचा, किल्ल्याच्या उंच कड्यांचा आणि ऐतिहासिक पॉईंट्सचा खालून दिसणारा अद्वितीय अनुभव असल्याचे युथ क्लब महाडचे संयोजक यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. टकमक टोक, वाघेरी खिंड, भवानी टोक यांसारखे पॉईंट्स खालून अनुभवताना मनात जागणारी शौर्याची, अस्मितेची आणि इतिहासाच्या अभिमानाची भावना अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी यंदाही सर्व आवश्यक सोयींची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. १४ ते १६ किलोमीटर अंतराच्या या प्रदक्षिणेत १० वर्षांवरील कोणताही सशक्त व्यक्ती सहभागी होऊ शकतो. प्रवेश शुल्क ₹४०० असून यात प्रारंभी चहा-नाश्ता, वाटेत पॅक लंच आणि शेवटी भोजनाचा समावेश आहे.

प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागीला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि युथ क्लब महाडचे अध्यक्ष राजेश बुटाला यांच्या स्वाक्षरीचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. संपूर्ण मार्गावर युथ क्लबचे कार्यकर्ते मार्गदर्शन व मदत देण्यासाठी तैनात असतील.

युथ क्लब महाडने महाराष्ट्रभरातील नागरिकांनी या ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि प्रेरणादायी प्रदक्षिणेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपक्रम अधिक भव्य आणि यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *