जनकल्याण पार्टी अबोल जीवांच्या हक्कासाठी कटिबद्ध – हार्दिक हुंडिया

मुंबई : सर्वधर्मीय, सर्वसमावेशक आणि अबोल जीवांच्या हक्कांसाठी लढणारी पहिलीच राजकीय संस्था म्हणून जन कल्याण पार्टी समाजात नवा संदेश देत आहे, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडिया यांनी केले. जैन मुनि नीलेशचंद्रजी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या पक्षाचा उद्देश ‘जनतेचे आणि निशब्द जीवांचे कल्याण’ हा आहे, असे ते म्हणाले.
हुंडिया यांनी स्पष्ट केले की, जन कल्याण पार्टी कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात नाही, उलट जनता आणि अबोल जीवांच्या हितासाठी काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला ही पार्टी पाठिंबा देईल. “बीजेपी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी कोणताही पक्ष असो – जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही राहू,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – एकदा निवडून आले की ते संपूर्ण देश-राज्याचे नेते असतात. मग जनता आपापसात का भांडायचे? आम्ही द्वेषाची नव्हे तर सुशासनाची राजकारण आणण्यासाठी आलो आहोत.”
पत्रकारितेत ३० वर्षे कार्यरत असलेल्या हुंडिया यांनी सांगितले की, धर्माच्या नावावर होणारा अन्याय, भ्रष्टाचार, अधर्म यांना उजेडात आणल्याबद्दल त्यांच्यावर दोन एफआयआर दाखल करण्यात आले. “मी स्वतः जैन आहे; त्यामुळे धर्माचे रक्षण करणे आणि चुकीच्या गोष्टी समाजासमोर आणणे ही माझी जबाबदारी आहे. पण सत्य मांडल्यावरही अन्याय सहन करावा लागला,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राजकारणात येण्यामागील हेतू सांगताना ते म्हणाले, “सत्ता मिळाली तर चुकीची कामे कशी थांबवायची, न्याय कसा सर्वांना मिळवून द्यायचा — हे माझे पहिले कर्तव्य असेल.”
जैन मुनि नीलेशचंद्रजी यांनीच त्यांना जन कल्याण पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले असून आता सर्व पक्षांना सोबत घेऊन सुशासनाची दिशा देण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
“महाराष्ट्राच्या विकासामागे आमच्या मराठी बांधवांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सहकार्यानेच पुढील वाटचाल अधिक मजबूत होईल,” असेही हुंडिया म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *