महाड (प्रतिनिधी) महाड नगर परिषदेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये तयार करण्यात आलेल्या डेव्हलपमेंट प्लॅन मधील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत तर आहेत मात्र त्यातील अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून शासनाचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत अर्धवट अवस्थेतील रस्त्यांवर मद्यपी रात्रीच्या सुमारास खुलेआम पणे बसून पार्ट्या करत असल्याने बार ऐवजी खुल्या वातावरणात रस्त्यावर बसून मद्यपींचा धुमाकूळ चालण्याचे चित्र पाहण्यास मिळत असताना नगरपरिषद व पोलीस प्रशासन मात्र गप्प बसल्याचे पाहण्यास मिळत आहे
याबाबत अधिक माहिती अशी की महाड शहरात महाड नगर परिषदेच्या गेल्या साडेचार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनमधील अनेक नव्या रस्त्यांना मंजुरी मिळाली. त्यापैकी दस्तुरी नाका ते नातेखिंडदरम्यान डॉक्टर महामणकर हॉस्पिटल व सुभाष आर्केड यांच्या मधील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मोठ्या घाईगडबडीत सुरू झाले आणि तितक्याच अचानकपणे अर्ध्यावर येऊन थांबले.
महाड नगर परिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅन मधील हा अर्धवट असणारा रस्ता आता प्रशासनासाठी तसेच शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी तर शहरासाठी लाजिरवाणे चित्र बनला आहे. रात्रीच्या अंधारात हा रस्ता तळीरामांचा अड्डा झाल्याचे सतत दिसून येते. ठिकठिकाणी रंगीत पार्ट्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, सिगारेटचे थुटके, गुटख्याच्या पाकिटांचे ढीग या सर्वांनी रस्ता कचर्याचे डेपो बनला आहे.
महाड नगर परिषदेच्या डेव्हलपमेंट पॅन्ट मधील हा अर्धवट अवस्थेतील रस्ता नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भानामतीचे प्रकार करण्यासाठी तसेच “ओम फट स्वाहा” सारखे प्रकार देखील या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या काळात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन केल्याचे पाहण्यास मिळत आहे महाड नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरु असताना देखील या ठिकाणी मद्यपी निर्भयपणे बसत होते, तरी त्यांच्यावर कोणीही कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या अर्धवट रस्त्याकडे नगरपरिषद व पोलिस दोघांचेही अक्षम्य दुर्लक्ष. होत असल्याने तळीरामांना हा मोठा मध्य प्राशन करण्यासाठी खुल्या वातावरणातला अड्डा तयार झाल्याचे चित्र या रस्त्यावर फेरफटका मारले असता पाहण्यास मिळाले आता नगरपरिषद कारवाई करणार की पोलीस यंत्रणा कारवाई करणार असा अहवाल महाडमधील सर्वसामान्य जनता विचारीत आहे