चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिन; “समतेच्या क्रांतीचे सूर्य” — एकनाथ शिंदे

 

मुंबई : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या समतेच्या क्रांतीचे सूर्य आहेत. महाराष्ट्राच्या मातीत असा महामानव जन्माला आला, ज्याच्या तेजाने संपूर्ण जग उजळून निघाले,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

 

शिंदे यांनी बाबासाहेबांच्या ज्ञानलालसेचा, अन्यायाविरुद्ध लढण्याच्या त्यांच्या अद्वितीय चिकाटीचा आणि शिक्षणाला दिलेल्या सर्वोच्च स्थानाचा विशेष उल्लेख केला. “सामाजिक बहिष्कार आणि विषमता सहन करत, शिक्षणाच्या बळावर जगातील अग्रगण्य विद्वानांच्या श्रेणीत त्यांनी आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मानवमुक्तीच्या संघर्षाला वाहिला गेला,” असेही त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, संजय राठोड, संजय शिरसाट, संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, प्रा. नरेंद्र जाधव, आनंदराज आंबेडकर, आमदार कालिदास कोळंबकर आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. महापालिकेचे आयुक्त आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

 

भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी दिलेले भारतीय संविधान हे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभारलेले लोकशाहीचे भक्कम अधिष्ठान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा त्रिसूत्री मंत्र आजही तितकाच सामर्थ्यवान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आणि विदेशातून अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल झाले असून परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे. सामाजिक ऐक्य, समानता आणि मानवतेचा संदेश देणारे वातावरण सर्वत्र पाहायला मिळाले.

शिंदे यांनी चेंबूरमधील भीमज्योती कार्यक्रमासह दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या स्मारकांचाही उल्लेख केला. “ही स्मारके केवळ वास्तू नसून भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी विचारधन आहेत,” असे त्यांनी सांगत समता, न्याय आणि स्वाभिमानाच्या बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार कार्य करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *