मीरा रोड : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील ‘गौरव एक्सीडेन्सी’ परिसरातील अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी सकाळी मोठ्या दिमाखात कारवाईसाठी दाखल झालेल्या पथकाने कोणतीही कारवाई न करता संध्याकाळी माघारी वळताच परिसरात खळबळ उडाली. सहाय्यक आयुक्त स्वप्निल सावंत हे पोलीस फोर्स, कर्मचारी, जेसीबीसह कारवाईसाठी पोहोचले होते; मात्र काही क्षणांतच पथक परतल्याने नागरिकांची भुवया उंचावल्या असून संतापाची ठिणगी पडली आहे.
कारवाई न करण्यामागे कोणाचा हात?
मोठा पोलीस बंदोबस्त, यंत्रसामग्री, कर्मचारी यावर खर्च करूनही कारवाई न केल्याने राजकीय दबाव, मिलीभगत की दुसरे ‘हितसंबंध’? याबाबत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. अनधिकृत बांधकाम धारकांकडे कोणतीही कायदेशीर मंजुरी नसताना महापालिकेने मागे का हटले, हा प्रश्न नागरिकांनी थेट उपस्थित केला.
महापालिकेचा खर्च वाया?
महानगरपालिका आर्थिक तुटीने ग्रासलेली असताना अशा ‘भव्य’ कारवाईसाठी उभा केलेला फोर्स आणि त्यावर उधळलेला पैसा अखेर कोणासाठी?
“महापालिकेला अचानक पैशांची खैरात लागली का?
कर्जात बुडालेली पालिका एवढी फाजीलखर्ची का?”
असा सवाल नागरिक संतापून करीत आहेत.
नोटिसा, कागदपत्रे कुठे गायब?
अनधिकृत बांधकामांसाठी जारी केलेल्या नोटिसा व कायदेशीर प्रक्रियेचे काय झाले? पथकाने जागेवर कोणतीही चौकशी न करता कारवाई न करता परत गेल्याने, “अधिकारी झोपेतून उठून सरळ कारवाईला गेले होते का?” अशी उपहासात्मक टीका होत आहे.
पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
महापालिका प्रशासनाच्या वागणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनधिकृत बांधकामे वाढत असताना कारवाई अर्ध्यावर सोडणे म्हणजेच ‘अनधिकृत बांधकाम करणारे –महापालिका–राजकारण’ या त्रिकुटाच्या नात्याचा पुरावा असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
नागरिकांच्या ठाम मागण्या
कारवाई थांबवण्यामागील कारणे तात्काळ जाहीर करावीत जवाबदार अधिकाऱ्यांवर चौकशी लावावी
अनधिकृत बांधकामांवर निर्णायक आणि पारदर्शक कारवाई करावी
महापालिकेचा झालेला खर्च व फोर्सचा वापर – सर्वांचा हिशेब द्यावा
गौरव एक्सीडेन्सी परिसरातील ह्या घटनेचा आता मीरा रोड–भाईंदरमध्ये चर्चा होत आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई दाखवणारी व त्यात प्रसिद्धी घेणारी पालिका प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र अपयशी ठरत आहे, ह्या कटू सत्याचा साक्षात्कार पुन्हा एकदा नागरिकांनी अनुभवल्याचे चित्र आहे.