पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. तसेच पक्षप्रवेशानंतर शिवसेनेने ( एकनाथ शिंदे) त्याला जालना विधानसभेच्या प्रमुखपदाची जबाबादारीही दिली आहे. श्रीकांत पांगारकरच्या या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विरोधकांकडून शिवसेनेला ( एकनाथ शिंदे ) लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “हे अतिशय धक्कादायक आहे. गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले, याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. पुढे बोलताना, “प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके सरकारच्या घटक पक्षाने पावन करुन घेतले आहे. या सरकारला न्यायाच्या राज्याबाबत शून्य आदर आहे, म्हणूनच महाराष्ट्राला खोके सरकारला नाकारणारे आणि कायद्याचा आब आणि आदर करणारे शासन हवे आहे”, असेही त्या म्हणाल्या.
अर्जून खोतकरांच्या उपस्थितीत श्रीकांत पांगारकरचा पक्षप्रवेश
दरम्यान, काल जालन्यात माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत श्रीकांत पांगारकरच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यासंदर्भात पीटीआयशी बोलताना, “श्रीकांत पांगारकर हे माजी शिवसैनिक आहेत. ते परत पक्षात आले आहेत. त्यांची जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.” अशी प्रतिक्रिया अर्जून खोतकर यांनी दिली होती. तसेच यावेळी जालन्यातून त्यांना उमेदवारी दिली जाणार का?असं विचारलं असता, “श्रीकांत पांगारकर हे जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. पण महायुतीचे जागावाटप अद्याप झालेलं नाही.त्यामुळे याबाबत सध्या काही बोलता येणार नाही”, असे ते म्हणाले होते. वर्ष २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या बंगळुरूतील राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एसआयटीने अमोल काळे नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने महाराष्ट्रातील व्यक्तीने गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं होतं. श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता, हे एसआयटीच्या तपासात पुढे आलं होतं. त्यानंतर २०१८ मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. पण ४ सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने श्रीकांत पांगारकरला जामीन मंजूर केला. तेव्हापासून तो जामिनावर बाहेर आहे. जालन्यातील श्रीकांत पांगारकर हा शिवसेनेचा माजी नगरसेवक असला तरी त्याचे वडील जगन्नाथ पांगारकर हे भाजपाचे माजी नगरसेवक होते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जायचे. साधारणत: २० ते २५ वर्षांपूर्वी जालन्यात शिवसेनेचा जोमात होती. त्यावेळी जगन्नाथ पांगारकर यांचा मुलगा श्रीकांतने शिवसेनेत प्रवेश केला. २००१ ते २०१० अशी सलग १० वर्षे तो शिवसेनेचा नगरसेवक होता. २०११ मध्ये त्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर श्रीकांत पांगारकर हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम केलं. तो केदारनाथमधील जलप्रलयानंतर तिथे मदतकार्यासाठीदेखील गेला होता, अशी माहिती आहे.