मुंबई – भाजपा गटनेते आमदा प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून साकारण्यात आलेल्या मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचा लोकार्पण सोहळा आज उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना उत्तम भविष्य देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार पियुष गोयल यांनी केले.
आ. प्रविण दरेकर यांच्या विकासनिधीतून साकारण्यात आलेल्या मागाठाणे विधानसभेतील शिवाजीनगर हनुमान टेकडी, बोरिवली (पूर्व) येथे समाजकल्याण केंद्र, अष्टविनायक मित्र मंडळ, काजूपाडा येथे समाजकल्याण केंद्र व कार्यालय, अभिनव नगर बोरिवली (पूर्व) येथे ऍम्फीथिएटर व ओधवनगर आणि रहेजा सोसायटी, कुलूपवाडी, बोरिवली (पूर्व) येथील उद्यानांचे लोकार्पण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी आमदार भाई गिरकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना माजी नगरसेवक संजय घाडी, मुंबई भाजपा महामंत्री गणेश खणकर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक तावडे, रश्मी भोसले, मागाठाणे उत्तर विधानसभेचे मंडल अध्यक्ष अमित उतेकर, मागाठाणे मध्य विधानसभेच्या मंडल अध्यक्षा सोनाली नखुरे यांसह मोठ्या संख्येने परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार पियुष गोयल म्हणाले कि, अनेक वर्षांपासून देशात सामान्य नागरिकांसाठी सरकारे चिंता कमी करत असत. निवडणुका आल्या कि नागरिकांना लाभ द्यायचा, लोकांना संमोहित करून सरकारे आली आणि गेली. एकाच गांधी परिवाराने या देशात शासन केले. त्यामुळे देशातील सामान्य नागरिकांच्या घरात जी विकासाची लाट पोचायला हवी होती ती पोहोचू शकली नाही. मोजक्या लोकांनाच फायदा पोचला.
ते पुढे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ ला देशाची कमान सांभाळली तेव्हा देशात असा संवेदनशील नेता ज्याने स्वतः आपले आयुष्य साधारण कुटुंबात घालवले. त्यांच्या घरात वीज, पाणी नसायचे. शाळेच्या पुस्तकांसाठी पैसे नव्हते. रेल्वे स्टेशनवर चहा विकत त्यांनी शाळेसाठी कपडे, पुस्तके घेतली. संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले. ५० वर्षाच्या राजकारणात त्यांनी कधीच स्वतःवर भ्रष्टाचाराचा डाग लावून घेतला नाही. १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सेवा केली. २०१४ ला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पंतप्रधान झाले. ११ वर्ष त्यांनी देशाच्या प्रत्येक व्यक्तीची काळजी केली. गरीब, आदिवासी, शेतकरी, कामगार, युवक, युवतीच्या आयुष्यात कसे बदल होतील यासाठी सदैव प्रयत्नशिल राहिले. त्याचेच फळ म्हणून महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि आता बिहारमध्ये प्रचंड बहुमताने तेथील जनतेने एनडीएला विजयी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रत्येक क्षण तुम्हा सर्वांसाठी समर्पित आहे. तुमचे आयुष्य सुखकर होवो, तुम्ही विकासाच्या लाटेशी जोडले जावे. जेव्हा तुमच्या आयुष्यात विकास होईल तेव्हाच महाराष्ट्र विकसित होईल, जेव्हा महाराष्ट्र विकसित होईल तेव्हा देश विकसित होईल, हाच संकल्प पंतप्रधान मोदींचा असल्याचे खा. गोयल म्हणाले.

खा. गोयल पुढे म्हणाले कि, मंडलासाठी उत्तम अशा प्रकारचे दुमजली समाजकल्याण केंद्र बनवले आहे. येथे वाचनालय, व्यायाम शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी योग करता यावा अशी व्यवस्था तयार करा. लवकरात लवकर या क्षेत्राचा पुनर्विकास करायला हवा. समूह पुनर्विकास ही तुमची मागणी आहे. जिथे राहता तिथेच पक्के घर तुम्हाला मिळावे. महायुतीचे सर्व नेते मुंबईला विकासाशी जोडताहेत तसेच तुमचेही पक्के घर बनावे. येणाऱ्या काळात या क्षेत्राचा विकास होणार असून उज्वल भविष्यासाठी सर्वांनी मिळून कामकरूया,असे आवाहनही गोयल यांनी केले.
उत्तर मुंबई उत्तम होताना दिसतेय- आ. प्रविण दरेकर
भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले कि, खासदार पियुष गोयल केंद्रात मंत्री आहेत. केंद्र सरकारमध्ये त्यांचा दबदबा आहे. असे मंत्री खासदार म्हणून उत्तर मुंबईला लाभले हे आपले भाग्य आहे. उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवायची असे खा. गोयल म्हणाले होते. आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय. आपली उत्तर मुंबई उत्तम होताना प्रत्येक ठिकाणी दिसतेय. येथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. खासदार गोयल यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे निर्देश दिले आणि पाणी प्रश्नावर काम सुरु झालेय. उत्तर मुंबईचा नियोजनबद्ध विकास होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली क्लस्टरच्या माध्यमातून झोपडपट्ट्या विकसित होणार आहेत. आम्ही अनेक विकासाची कामे केली. येणाऱ्या मनपा निवडणुकीत भाजपा, शिवसेना व महायुतीच्या मागे भक्कमपणे उभे राहा, असे आवाहनही दरेकर यांनी नागरिकांना केले
