महाड (विशेष प्रतिनिधी) महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे मारहाण प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी मनसेचे वरिष्ठ नेते आज महाडमध्ये दाखल होत असल्याने या प्रकरणी महाडमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल राजकीय टीका टिपणी केली होती त्याच प्रत्युत्तर म्हणून महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी सोशल मीडियावर फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्यावर वैयक्तिक टीका टिपणी केली होती या गोष्टीचा राग मनामध्ये धरून शिवसेना शिंदे गटाच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांनी पंकज उमासरे यांच्या चवदार तळे येतील पंकज प्रेम मास्टर व फोटो स्टुडिओ या दुकानात येऊन पंकज उमासरे यांना लाथा बुक्क्यांनी व हाताच्या ठोशाने मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह रोहन भेंडवाल, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, सौजन्य कानेकर ,भावड्या सुर्वे, निरज खेडेकर, सुनंदा पवार यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम११७(२), १८९(२), १९०,११५(२), ३५२,३५१(२), ३२४(२), प्रमाणे गुन्हा दाखल केला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे तपास करीत आहेत मात्र एक नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता गुन्हा घडल्यानंतर २ नोव्हेंबर पहाटे ४.३८ वाजता गुन्हा दाखल केला आहे
याबाबत महाड मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
याबाबत महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी तपास अधिकारी खाडे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले मात्र खाडे यांनी देखील याबाबत बोलण्यास नकार देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्याशी संपर्क केला असता मी कामानिमित्त म्हसळा येथे आलो असल्याचे सांगून पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना याबाबत माहिती देण्यास सांगतो असे सांगितले