रचिन रवींद्रने ‘घरच्या मैदानावर’ झळकावले दणदणीत शतक, एका दशकानंतर न्यूझीलंडसाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

Spread the love

भारत वि न्यूझीलंड कसोटीतील तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्रने दणदणीत शतक झळकावले आहे. रचिनने १२५ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांसह १०४ धावा करून अजूनही मैदानावर कायम आहे. भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर झटपट विकेट्स मिळवल्या, पण अर्धशतक पूर्ण होताच रचिनने फटकेबाजी करायला सुरूवात केली आणि अखेर त्याने चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसह आपले शतक पूर्ण केले. रचिन रवींद्र आणि टीम साऊदीच्या जोडीने भारतीय संघाच्या कमबॅकच्या आशांवर पाणी फेरले आणि मोठ्या धावसंख्येच्या आघाडीकडे वाटचाल करत आहेत. न्यूझीलंड संघाचा फलंदाज रचिन रवींद्रने बेंगळुरू कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांना जेरीस आणले. रचिन रवींद्रने दमदार शतक झळकावले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. रचिन रवींद्र न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळत असला तरी तो मूळचा भारतीय वंशाचा आहे. त्याचे आजी आजोबा बंगळुरूचे असून त्याने जणू काही आपल्या होम ग्राऊंडवरच शतक झळकावले आहे. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळतानाही रचिनने याच मैदानावर शतक झळकावले होते.

रचिन रवींद्रने शतक झळकावत घडवला इतिहास

रचिन रवींद्रने या सामन्यात विस्फोटक फलंदाजी करत शतक झळकावले आणि न्यूझीलंडसाठी इतिहास घडवण्यात यशस्वी ठरला. गेल्या दशकभरात भारतात एकाही न्यूझीलंडच्या खेळाडूला शतक झळकावता आलेले नाही, पण रचिन रवींद्रने संघाच्या शतकांचा भारतातील दुष्काळ संपवला आहे. किवी संघाचा महान फलंदाज रॉस टेलरनंतर तब्बल १२ वर्षांनंतर रचिन रवींद्रने भारतात शतक झळकावण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारतात शेवटचे शतक २०१२ मध्ये केले होते. रॉस टेलरने २०१२ मध्ये बेंगळुरूमध्ये ११३ धावांची खेळी खेळली होती. तब्बल १२ वर्षांनंतर रचिन रवींद्रनेही याच मैदानावर शतक झळकावले आहे. डावखुरा फलंदाज रचिन रवींद्रने या सामन्यात १२४ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. या डावात त्याचा स्ट्राईक रेट ८३ पेक्षा जास्त होता. एवढेच नाही तर त्याने आपले अर्धशतक ८८ चेंडूत पूर्ण केले, परंतु अर्धशतकानंतर त्याने अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावले आहे. रचिनच्या या खेळीने न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत मिळाली आहे. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने ७ गडी गमावून ३४५ धावा केल्या आहेत. सध्या न्यूझीलंडकडे २९९ धावांची आघाडी आहे. या सामन्यात भारतीय संघ ४६ धावांत ऑलआऊट झाला होता. अशा स्थितीत टीम इंडियाला आता एका डावाने पराभवाचा धोका आहे. भारताच्या दोन-तीन फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारत प्रथम न्यूझीलंडची आघाडी संपवली आणि मग किवी संघासमोर चांगले लक्ष्य ठेवले तरच टीम इंडियाला हा सामना जिंकता येईल. मात्र, न्यूझीलंडचे उर्वरित तीन विकेट झटपट मिळवणे हे भारतीय संघाचे पहिले लक्ष्य असेल. टीम साऊदी आणि रचिन रवींद्र यांच्यात ८व्या विकेटसाठी १०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *