खलिस्तानी फुटीर नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणामुळे गेल्या वर्षभरापासून भारत व कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. नुकतीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्यामुळे हे संबंध अधिकच बिघडले आहेत. दोन्ही देशांनी परस्परांचे उच्चपदस्थ राजनैतिक अधिकारी परत बोलावले आहेत. यादरम्यान, आता जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या नव्या विधानांमुळे द्वीपक्षीय संबंध चिघळण्याची शक्यता आहे. जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडातील अंतर्गत चौकशी समितीसमोर हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण व त्यापाठोपाठ भारतावर करण्यात आलेले आरोप याबाबत सविस्तर दिलेल्या माहितीमध्ये अनेक धक्कादायक दावे केले आहेत. “गेल्या वर्षी या प्रकरणात भारतावर आरोप केले तेव्हा आपल्याकडे कोणतेही सबळ पुरावे नव्हते, फक्त गुप्तचर यंत्रणेकडून आलेल्या माहितीच्या आधारे आपण भूमिका मांडली”, असा खुलासा जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे.
जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या या दाव्यानंतर भारतानं त्यावर परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “ट्रुडोंचं हे स्पष्टीकरण म्हणजे आम्ही सुरुवातीपासून मांडत आलेली भूमिका सत्य असल्याचंच निदर्शक आहे”, असं भारतानं सुनावलं आहे. तसेच, पुरावा सादर करण्याची आपली मागणी कायम ठेवली आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतासंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडली आहे. “आपण कॅनडाचं सार्वभौमत्व व सुरक्षेमध्ये हस्तक्षेप करू शकतो याचा इतक्या थेटपणे विचार करणं ही भारताची भयंकर चूक चूक होती”, असं जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या खुलाशामध्ये म्हटलं आहे. “आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला. पण या आरोपांवर भारतानं काय प्रतिसाद दिला? तर आमच्या सरकारवर, सरकारच्या एकात्मतेवर, कॅनडावर प्रतिहल्ले चढवले, कॅनडाच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भारतातून परत पाठवलं”, अशा शब्दांत जस्टिन ट्रुडोंनी भारतावर टीका केली आहे.
“आम्ही भारतासाठी जी-२० समिटमध्ये अडचण करू शकलो असतो”
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीत पार पडलेल्या जी-२० परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व जस्टिन ट्रुडो यांची भेट झाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यावेळी त्यांच्यात हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणाचीही चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र, त्यानंतर सारंकाही सुरळीत होत असल्याचं चित्र निर्माण झालेलं असतानाच ट्रुडो यांनी आता त्यासंदर्भात गंभीर दावे केले आहेत. “जी-२० परिषदेमध्ये भारतासाठी अडचण निर्माण करण्याची संधी आम्हाला होती. आम्ही जर तिथे जाहीरपणे आमचे आक्षेप मांडले असते तर भारतासाठी अवघड झालं असतं. पण आम्ही तसं न करण्याचा निर्णय घेतला. पडद्यामागे काम करत भारताकडून या प्रकरणात सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत राहिलो”, असं ते म्हणाले. दरम्यान, जी २० परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींना आपलं म्हणणं सांगितल्याचं ट्रुडो यावेळी चौकशी समितीसमोर म्हणाले. “मी पंतप्रधान मोदींना सांगितलं की आम्हाला माहिती आहे भारत सरकारच्या प्रतिनिधींचा यात सहभाग आहे. त्याबाबत आम्ही चिंताही व्यक्त केली. त्यावर मोदींनी नेहमीचीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कॅनडामध्ये असे लोक आहेत जे भारत सरकारच्या विरोधात जाहीरपणे बोलतात, त्यांना अटक केली जावी. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की कॅनडामध्ये इतर सरकारांवर व खुद्द कॅनडा सरकारवरही टीका करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथून पुढेही आम्ही भारत सरकरसोबत दहशतवादी कारवायांसारख्या गंभीर मुद्द्यांवर काम करत राहू”, असंही जस्टिन ट्रुडो यांनी नमूद केलं.