मीरा रोड, (प्रमोद देठे )- मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा विशेष आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीस ॲड. धर्मपाल मेश्राम, उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा), महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई प्रमुख उपस्थित होते.
बैठकीचे अध्यक्षस्थान राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.), आयुक्त तथा प्रशासक, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी भूषविले.
या वेळी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मागील पाच वर्षांतील अनुसूचित जाती घटकांसाठी करण्यात आलेल्या खर्च व अंमलात आलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महापालिकेकडे येणाऱ्या एकूण महसुलाच्या पाच टक्के निधीपैकी अनुसूचित जाती घटकांसाठी केलेल्या खर्चाचे परीक्षण तसेच त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंबंधी चर्चा झाली.
यावेळी नागरी दलित बस्ती विकास योजना, लाड पागे प्रलंबित प्रकरणे, तसेच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या या विषयांवरही सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक विभागाकडून मागील पाच वर्षांतील कामकाजाचे सविस्तर विवरण सादर करण्यात आले असून त्याची तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक सूचना मा. मेश्राम यांनी दिल्या.

अलीकडेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेने लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार दिलेल्या १९३ नियुक्त्यांपैकी ८३ नियुक्त्या अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या झाल्या आहेत. त्यापैकी दहा कर्मचाऱ्यांनी ॲड. धर्मपाल मेश्राम यांची भेट घेऊन विशेष आभार व्यक्त केले.
बैठकीदरम्यान आयोगाने समाजकल्याण विषयक कामकाजात पारदर्शकता वाढविणे, अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी निधीचा प्रभावी वापर करणे, आणि सर्वसमावेशक प्रशासन घडविण्याचे उद्दिष्ट ठेवणे या दिशेने कार्य करण्याचे निर्देश दिले.