प्रमोद देठे – कुलाबा येथील तिसऱ्या पास्ता लेनमधील मस्करा आर्ट गॅलरी येथे हिंदू देवतांचे विडंबन करणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गॅलरीत दाखल झाले, मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी सदर गॅलरी बंद केली होती.
सदर गॅलरीत यापूर्वीही अश्लील आणि धार्मिक भावना दुखावणारे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मनसेने कुलाबा पोलिस ठाण्यात निवेदन दिले.

या निवेदनात, देवदेवतांची विटंबना करणाऱ्या कलाकारावर आणि मस्करा आर्ट गॅलरीच्या मालकावर कडक कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, सदर गॅलरी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशीही आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे, विभाग अध्यक्ष वैभव शिंदे, शाखा अध्यक्ष परेश गायकवाड, तसेच योगेश चव्हाण, राजू पटेल, शुभम पाटील, राहुल आठवले, निलेश जड्यार आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसेने या प्रकाराला “हिंदू धर्माचा अपमान” ठरवले असून, यापुढे अशा प्रकारचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे.