पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ‘फुलवंती’ची प्रमुख लक्षवेधी भूमिका साकारली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यामुळे ‘फुलवंती’ची जादू बॉक्स ऑफिसवर किती चालणार याकडे प्राजक्ताच्या तमाम चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. या चित्रपटाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे… प्राजक्ता माळीची ( Prajakta Mali ) निर्मिती असलेला ‘फुलवंती’ हा पहिला चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘फुलवंती’ चित्रपटात तिच्यासह अभिनेता गश्मीर महाजनीने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रीमियरला बरेच मराठी कलाकार उपस्थित होते. याशिवाय इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत प्राजक्ताला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. चित्रपटाला प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
फुलवंती चित्रपटाचं कलेक्शन
प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ८ लाखांचा गल्ला जमावला होता. तर, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊन, फुलवंतीने तब्बल ३६ लाख कमावले. यानंतर रविवारी सुद्धा चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चांगली वाढ होऊन तिसऱ्या दिवशी सिनेमाने ७५ लाखांची कमाई केल्याचं वृत्त ‘सॅकनिल्क’ने दिलं आहे. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्ट्सनुसार ‘फुलवंती’ चित्रपटाची ३ दिवसांची एकूण कमाई १ कोटी १९ लाख एवढी आहे. शनिवार-रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झालेली वाढ पाहता आता येत्या काळात ‘फुलवंती’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ या चित्रपटात प्राजक्ता माळीसह प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, वैभव मांगले, हृषिकेश जोशी, स्नेहल, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात अशा मराठीतील अनेक नामवंत कलाकारांची फौज आहे. या चित्रपटाचं संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं असून निर्माती म्हणून हा प्राजक्ताचा पहिलाच चित्रपट आहे.