पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघातून बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्टार फलंदाज बाबर आझमला वगळण्यातनंतर नाराजी व्यक्त करत फखर जमानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने विराट कोहली आणि बीसीसीआयचे उदाहरण देताना, पीसीबीच्या निर्णयावर टीका केली होती. फखर जमानच्या या वक्तव्यानंतर पीसीबीचे अधिकारी नाराज झाले आहेत. पाकिस्तानच्या कसोटी संघातून बाबर आझमला वगळल्यानंतर फखर जमान म्हणाला की, पीसीबीने बीसीसीआयकडून शिकायला हवे. कारण विराट कोहली जेव्हा खराब फॉर्ममधून जात होता, तेव्हा बीसीसीआयने त्याला न वगळता सावरण्यासाठी पाठिंबा देताना बऱ्याच संधी दिल्या होत्या. त्याचप्रमाणे पीसीबीनेही बाबरसारख्या प्रमुख फलंदाजाला डावलण्याऐवजी त्याला पाठिंबा द्यावा. फखर जमानच्या या पोस्टनंतर पीसीबीचे काही मोठे पदाधिकारी नाराज आहेत.
पीसीबीचे अधिकारी फखर जमानवर नाराज
आता पीटीआयचा हवाला देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एका सूत्राने सांगितले की, बोर्डातील अनेक वरिष्ठ अधिकारी फखरच्या या पोस्टने खूश नाहीत. या सूत्राने सांगितले की, “बोर्डाचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी फखर जमानने केलेल्या पोस्टवर खूश नाहीत. या संदर्भात अधिकाऱ्यांनीही फखर जमानशी संपर्क साधला आहे.” आम्ही तुम्हाला सांगतो की, फखर जमान मे २०२४ पासून पाकिस्तान संघातून बाहेर आहे.
फखर जमानने ट्वीटमध्ये लिहिले होती की, ‘बाबर आझमला वगळण्याचा सल्ला ऐकून चिंताजनक वाटते. कारण बीसीसीआयने २०२० ते २०२३ या काळात विराट कोहलीची सरासरी १९.३३, २८.२१ आणि २६.५० अशी असतानाही त्याला संघातून वगळले नव्हते. जर आम्ही आमच्या आघाडीच्या फलंदाजाला बाजूला करण्याचा विचार करत आहोत, जो पाकिस्तानचा आजवरचा सर्वोत्तम फलंदाज आहे, तर या निर्णयाने संघात नकारात्मक संदेश जाऊ शकतो. पॅनिक बटण दाबणे टाळण्यासाठी अजूनही वेळ आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंना कमी लेखण्याऐवजी आपण त्यांना संधी दिली पाहिजे.’ बाबर आझम कसोटी क्रिकेटमधील त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे, ज्यामध्ये त्याला गेल्या १८ डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. याशिवाय बाबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बॅटने काही खास कामगिरी करताना दिसला नाही. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी बाबरने मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये पाकिस्तानी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कसोटी संघातून बाहेर पडणे बाबरसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.