मेगा बीच क्लीनअप मोहिमेत ४००० विद्यार्थ्यांचा सहभाग; ७४१० किलो कचरा संकलित

मिरा भाईंदर –  केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या “स्वच्छता ही सेवा – २०२५” या राष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “स्वच्छोत्सव” पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने, शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी “सेवापर्व २०२५” व “इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे” निमित्ताने मेगा बीच क्लीनअप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या उपक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत ४००० हून अधिक विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरिक व महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या सामूहिक प्रयत्नातून सुमारे ७४१० किलो प्लास्टिक व घनकचरा समुद्रकिनाऱ्यावरून संकलित करण्यात आला.


सर्व सहभागी सदस्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सक्रिय सहभाग नोंदवला. ही मोहिम केवळ परिसराच्या सौंदर्यासाठी नव्हे, तर पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त भारत आणि सागरी जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.
कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, केंद्र शासन प्रतिनिधी राजेंद्र सिंह बोरा, सिस्टीम मॅनेजर व जनसंपर्क अधिकारी राज घरत, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन, स्वप्नील सावंत, जितेंद्र कांबळे, वन विभागाचे अधिकारी मनीष पवार, तसेच अन्य अधिकारी व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *