राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा चहुबाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान या हल्ल्यामागे बिश्नोई गँग असल्याचे सांगितले गेले. ज्या दोन हल्लेखोरांना काल अटक करण्यात आली, त्यांनीही ते बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पोलीस या पोस्टची तथ्यता तपासत आहेत. हा कुणाचा खोडसाळपणा होता की, बिश्नोई गँगनेच ही पोस्ट केली? याची चौकशी होत आहे. दरम्यान ज्या अकाऊंटवरून पोस्ट टाकली गेली, तो स्वतःला बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगत आहे. मागच्या काही काळात सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत अनुज थापन याला अटक झाली होती. मात्र त्यानंतर त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यूला बाबा सिद्दीकी जबाबदार असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच बाबा सिद्दीकी सलमान खान आणि दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्यांची हत्या केली, असाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
काय लिहिले आहे पोस्टमध्ये?