आझाद मैदानावरील आंदोलकांसाठी मुंबई महापालिका कडून सुसज्ज सेवा-सुविधांची व्यवस्था

 

मुंबई | प्रतिनिधी : मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अत्यावश्यक नागरी सुविधा पुरवण्याची व्यापक तयारी केली आहे. सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींनंतरही आंदोलकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने जलद आणि कार्यक्षम उपाययोजना केल्या आहेत.
सततच्या पावसामुळे मैदानात चिखल साचल्याने प्रवेशात अडथळे येत होते. हे लक्षात घेता महापालिकेने चिखल हटवून प्रवेशमार्गावर दोन ट्रक खडी टाकून मार्ग समतल केला आहे.


आझाद मैदान व परिसरात पुरेशा प्रकाशाची गरज लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाच्या साहाय्याने प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.आंदोलकांसाठी ११ पाण्याचे टँकर्स उपलब्ध करून देण्यात आले असून, अतिरिक्त टँकर्सची मागणी देखील करण्यात आली आहे.
मैदान व आसपासच्या परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने साफसफाई केली जात आहे.


तसेच, पावसाळी हवामानामुळे कीटकनाशक धुर फवारणीसाठी दोन स्वतंत्र पथके कार्यरत आहेत.आरोग्य सुविधा सुनिश्चित करण्यासाठी मैदान परिसरातवैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.त्यात चार वैद्यकीय पथके,दोन रुग्णवाहिका,
१०८ आपत्कालीन सेवा २४ तास उपलब्ध ठेवण्यात आली आहे.महापालिकेने आंदोलकांसाठी मोफत व स्वच्छ शौचालयांची मोठी व्यवस्था केली आहे:मैदानात २९ शौचकूप असणारे शौचालय ठेवण्यात आले आहे.महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकूप असलेली ३ फिरती शौचालये,मेट्रो साइट शेजारी १२ पोर्टेबल शौचालये,फॅशन स्ट्रीट व आजूबाजूच्या परिसरात एकूण २५० फिरती शौचकूपे ठेवण्यात आली आहे.महापालिकेने स्पष्ट केले आहे की, आंदोलनस्थळी कोणतीही उपाहारगृहे, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे अथवा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आलेला नाही.

सर्व सेवा सुरळीत सुरू आहेत.आंदोलनस्थळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सातत्याने उपस्थित राहून देखरेख करत आहेत. इतर विभागांमधूनही अधिकारी, कर्मचारी व कामगारांची अतिरिक्त नेमणूक करण्यात आली आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या तत्पर आणि उत्तरदायी भूमिकेमुळे आंदोलकांना सुरक्षित व सुसज्ज वातावरण मिळाले असून मुंबई महानगरपालिकेने त्यांचा अधिकृत फेसफुक पेजवर त्याबद्दल माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *