मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारने संपूर्ण प्रशासन यंत्रणा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी हाती घेतलेल्या १५० दिवसांच्या “ई-गव्हर्नन्स सुधारणांच्या” विशेष मोहिमेत मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने आघाडी घेतली आहे. या कार्यालयाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाचे यश मिळवले आहे.
दिनांक ७ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवली जात असलेल्या या मोहिमेचा २९ ऑगस्ट रोजी अंतरिम प्रगतीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील विविध शासकीय यंत्रणांची कामगिरी विविध तांत्रिक आणि डिजिटल निकषांवर आधारित होती. यामध्ये ई-ऑफिस प्रणाली, ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर, GIS, ब्लॉकचेन, AI, Whatsapp Chatbot, डॅशबोर्ड्स आदींचा समावेश होता. या कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि त्यांच्या चमूचे विशेष अभिनंदन केले आहे. “ई-गव्हर्नन्ससारख्या सुधारणा कार्यक्रमात पोलिस प्रशासनाचा हा सहभाग कौतुकास्पद असून, पुढील काळात यामुळे नागरिकांपर्यंत पोलीस सेवा अधिक परिणामकारकपणे पोहोचेल,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे मूल्यमापन या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे.
२ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम पूर्णत्वास जाणार असून, अंतिम यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या या यशामुळे, ई-गव्हर्नन्समध्ये पोलिस विभागही तितक्याच जबाबदारीने पुढे येतो आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.