मुंबई / प्रतिनिधी : मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी करत ११ ऑगस्ट २०२५ पासून आझाद मैदान, मुंबई येथे प्रकाश नामदेव अहिरे, गटई कामगार प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, यांचे उपोषण सुरू आहे. त्यांनी शासनाकडे संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी व निलंबनाची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्तेप्रकाश नामदेव अहिरे यांची अतिरिक्त मुख्य सचिव मुळे यांच्या बरोबर भेट झाली. त्यांनी सांगितले की, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून संबंधित अभियंत्या विरोधात अहवाल मागविण्यात आला असून तो मिळाल्यानंतर पुढील १५ दिवसांत आवश्यक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, प्रकाश नामदेव अहिरे यांनी या उत्तरावर असमाधान व्यक्त केले आहे.त्यानंतर २८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रधान सचिव गोविंद राज यांच्याबरोबर पुन्हा एकदा भेट घेण्यात आली. पण त्यांच्याकडूनही सचिव मुळे यांनी दिलेल्या उत्तराचीच पुनरावृत्ती करण्यात आली, असा आरोप उपोषणकर्ते प्रकाश नामदेव अहिरे यांनी केला आहे.
“माझ्याकडे संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात स्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत. शासनाने केवळ अहवालाची वाट न पाहता, तत्काळ अधिकाऱ्याला निलंबित करून चौकशी सुरू करावी, ही आमची ठाम मागणी आहे. अन्यथा आमचं उपोषण आझाद मैदान येथे सुरुच राहील,” असे स्पष्ट केले आहे.त्यांनी यासंदर्भात शासनाने गांभीर्याने लक्ष घालावे आणि वेळेवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.