प्रमोद देठे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या नाना चौक येथील डी विभाग आरोग्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये धूर फवारणी व कीटकनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. सणाच्या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लक्षात घेता संदूषित आजारांचा फैलाव टाळण्यासाठी ही उपाययोजना महापालिकेने हाती घेतली आहे.
गणेश मंडपांमध्ये साचलेले पाणी, गर्दीमुळे होणारा उष्मा आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी विभागातील सर्व प्रमुख गणेश मंडळांमध्ये फवारणीची मोहीम हाती घेतली आहे.
आरोग्य निरीक्षकांच्या देखरेखीखाली धूर फवारणी व द्रव औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक केला जात आहे. तसेच मंडळांना स्वच्छता राखण्याचे आणि पाणी साचू न देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.महापालिकेच्या या उपक्रमामुळे गणेशभक्तांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे गणेशोत्सव काळात २४x७ उपलब्ध राहून आवश्यक सेवा देणार असल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.