श्रीगणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेच्या कृत्रिम तलावांची आयुक्तांकडून पाहणी
भाईंदर – मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांनी आज दीड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध कृत्रिम तलावांची प्रत्यक्ष पाहणी करत तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान मांडली तलाव, सुभाषचंद्र बोस मैदान, मुर्धा गाव, राई गाव, शिवार गार्डन आणि जेसल पार्क या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांची तपासणी करण्यात आली. गणेश भक्तांना विसर्जनाच्या वेळी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध राहतील याचे काटेकोर नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, सहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक, तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.महापालिकेच्या वतीने गणेश भक्तांनी कृत्रिम तलावांचा अधिकाधिक वापर करावा आणि पर्यावरणपूरक विसर्जनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.