मुंबई, २५ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एमएसआरटीसी) मोठा आर्थिक दिलासा देत जुलै २०२५ महिन्यासाठी तब्बल रु.४७७.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी सवलतमूल्य भरपाईसाठी असून, तो बिनशर्त आणि थेट महामंडळाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
हा निधी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील ठराविक लेखाशिर्षातून उपलब्ध करून देण्यात येणार असून, वित्त विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक २०२५०८२५१४५९४८३४२९ असा आहे.
या निधीमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी मिळणार असून, प्रवाशांना नियमित व सुरक्षित सेवा पुरवण्यासाठी मदत होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी परिवहन आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की,
> “एसटी महामंडळ हे ग्रामीण भागासह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचे प्रमुख साधन आहे. प्रवाशांना सुरक्षित व परवडणारी सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने हा निधी रोखीने उपलब्ध करून दिला आहे.”
ते पुढे म्हणाले की,
> “राज्य सरकार एसटी महामंडळाच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे. यासाठी वेळोवेळी विविध आर्थिक सहाय्य आणि उपाययोजना केल्या जात आहेत.”
हा निधी मंजूर झाल्याने एसटीचे कर्मचारी, प्रवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.