मुंबई, २४ ऑगस्ट २०२५ — संपूर्ण देशाचे आणि परदेशातील गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेला लालबागचा राजा यंदा आपल्या ९२व्या वर्षात भक्तांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या २७ ऑगस्ट (बुधवार) ते ६ सप्टेंबर (शनिवार) दरम्यान मुंबईत गणेशभक्तांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला, रविवारी मंडळातर्फे माध्यम प्रतिनिधांसाठी खास छायाचित्रण सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात लालबागच्या राजाच्या २०२५ मधील पहिले दर्शन झाले.आकर्षक मूर्ती, भक्तीमय सजावट आणि दिव्य आभा यामुळे पहिल्याच दर्शनातच भक्तांच्या मनात स्थान मिळवले.
लाखो भाविकांची गर्दी दरवर्षीप्रमाणे यंदाही अपेक्षित असून, देश-विदेशातून श्रद्धाळू मुंबईत दाखल होणार आहेत. मंडळाने सजावट, भक्तीमय वातावरण आणि भाविकांच्या सोयीसुविधांबाबत विशेष काळजी घेतली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांनी संयम बाळगावा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मंडळाने केले आहे.
गणेशोत्सव काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, लालबाग परिसरात उत्सवाचे मोठे स्वरूप पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावरही राजाच्या पहिल्या दर्शनाची झलक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गणेशोत्सवाची ही औपचारिक सुरुवात असून, मुंबई पुन्हा एकदा ‘गणपती बाप्पा मोरया!’ च्या जयघोषाने दुमदुमणार आहे