मीरा भाईंदर, २२ ऑगस्ट – मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी मोहिमेच्या अंतर्गत कारवाई करताना स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईच्या नावाखाली थेट लूटच केल्याची धक्कादायक घटना प्रभाग क्रमांक ६ मध्ये घडली आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, भाजप नेते व १४५ विधानसभा प्रमुख ॲड. रवी व्यास यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करत संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी पुतळ्याजवळील एका मेडिकल स्टोअरमध्ये महापालिकेचे काही अधिकारी, स्थानिक स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी दाखल झाले. त्यांनी दुकानदार रामसिंग दहिया यांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत दंडाची धमकी दिली. दुकानदाराने शांतपणे नियमांनुसार उत्तर दिले असता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संतप्त होत दुकानातील काही महत्त्वाच्या वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेल्या.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील ॲड. रवी व्यास यांनी महापालिका आयुक्त राधाविनोद शर्मा यांच्याकडे सादर केले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत सरळ लुटीचा प्रकार केला असल्याचे त्यांनी ठम्हटले आहे.
“कारवाईच्या नावाखाली अशा प्रकारच्या घटना घडणे हे गंभीर असून, यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि महापालिकेची प्रतिमा मलीन होते,” असे सांगत ॲड. रवी व्यास यांनी आयुक्तांकडे संबंधित स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे,लुटलेला संपूर्ण माल दुकानदाराला परत द्यावा,या प्रकारात सहभागी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी असे लेखी पत्र देऊन मागणी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी व्यापारी वर्गातूनही मागणी होत आहे.