मिरा रोड – मिरा रोड येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात बुधवार, २० ऑगस्ट रोजी पारंपारिक आणि सांस्कृतिक “चला खेळूया मंगळागौर” सोहळा जल्लोषात पार पडला. सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम महिलांच्या सहभागाने गाजला असून यंदा तब्बल ३१ महिला गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मंगळागौर निमित्त विविध खेळ, गाणी आणि पारंपारिक उपक्रमांसह सामाजिक जनजागृती करणारी सादरीकरणे रंगली. यामध्ये किन्नर समाजावरील वास्तव मांडणारे “बाईपण भारी” ग्रुपचे सादरीकरण, प्लास्टिकविरोधी संदेश देणारे “शिवकन्या महिला ग्रुप” तसेच पारंपरिक मंगळागौर आणि योगाचा मेळ घालणारे “शक्ती मंगळागौर ग्रुप” यांचे सादरीकरण विशेष दाद घेऊन गेले.
महिलांना एकत्र आणून परंपरा जपत सामाजिक ऐक्य आणि मनोबल वृद्धिंगत करण्याचा हेतू या कार्यक्रमातून साधला गेला. विशेष म्हणजे लकी ड्रॉच्या माध्यमातून ११ महिलांना स्वयंपाकघरात उपयुक्त ठरतील अशा आकर्षक इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट देण्यात आल्या.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व पालकमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहिले. त्यांनी आयोजकांचे कौतुक करताना महिलांचा सहभाग, आत्मविश्वास आणि समाजातील योगदान अधोरेखित केले.