मीरा-भाईंदरमध्ये ‘नवस आंदोलन’ — नागरिकाचा खड्डेमुक्त शहरासाठी अनोखा संघर्ष!

भाईंदर, २ ऑगस्ट २०२५:bमीरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवरील खड्डे, दैनंदिन वाहतुकीतील त्रास व कोट्यवधी निधी असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका जागरूक नागरिकाने अनोख्या मार्गाने आंदोलन जाहीर केले आहे.

 

उमेश रमेश शिंदे या नागरिकाने दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता, भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशनपासून मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयापर्यंत लोळत जाऊन आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्धार केला आहे. या प्रकारचे “नवस आंदोलन” हे धार्मिक नसून सामान्य जनतेच्या अपुऱ्या सुरक्षिततेविरुद्ध एक भावनिक आणि प्रतीकात्मक आंदोलन आहे.

 

श्री. शिंदे यांनी आपल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्यांवरील खड्डे कायम राहतात. सिमेंट काँक्रिटचे रस्ते सहा महिन्यांत तडे जातात, डांबरी रस्ते महिन्याभरात खचतात, त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. रुग्णवाहिका, शाळकरी मुले, गरोदर महिला, कामावर जाणारे नागरिक या खड्ड्यांत अडकत आहेत.

 

या सर्व परिस्थितीसाठी महापालिका बांधकाम विभाग, एमएमआरडीए, तसेच दीर्घकाळ एकाच पदावर कार्यरत असलेले अभियंते जबाबदार असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी आयुक्तांकडे अशा कर्मचाऱ्यांची बदली व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

 

हे आंदोलन शांततेत, कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा भंग न करता पार पाडले जाईल, याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आहे. त्यांनी पोलीस ठाण्याकडे लेखी निवेदन सादर केले असून, भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस उपायुक्त कार्यालयाने या आंदोलनाची नोंद घेतली आहे.

 

“हे आंदोलन कुणाविरुद्ध नाही, तर लोकशाहीतील ‘देवळा’त नवस करणारे एक हतबल नागरिकाचे मनोगत आहे,” असे उमेश शिंदे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *