शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना; शासन निर्णय निर्गमित

मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

 

डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन होवू नये याकरिता मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत.

 

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ हे सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू राहतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

 

महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना :-

 

राज्य शासनातील अधिकारी-कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम तसेच प्रतिनियुक्तीने किंवा करारपद्धतीने नेमलेले कर्मचारी यांना हे नियम लागू राहणार आहेत.

 

शासनाच्या किंवा भारतातील कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलिकडच्या धोरणावर प्रतिकूल टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा.

 

वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट स्वतंत्र ठेवावेत. केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट किंवा अॅपचा वापर करू नये. शासकीय योजना व उपक्रमांच्या प्रसारासाठी केवळ अधिकृत आणि प्राधिकृत माध्यमांचा वापर करावा.

 

कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.

 

शासकीय योजनांच्या यशस्वितेसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करता येईल; मात्र त्यातून स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. वैयक्तिक अकाऊंटवर शासकीय पदनाम, लोगो, गणवेश, शासकीय मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू नयेत. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, भेदभाव करणारा मजकूर पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे मनाई आहे. प्राधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज सोशल मीडियावर अपलोड करू नयेत. बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे.

 

शासनाने स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल. डिजिटल युगात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा आणि शासकीय यंत्रणेचा विश्वासार्हता अबाधित राहावी, यासाठी नियमावली करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *