लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएला बहुमत मिळाले असून भाजपाच्या नेतृत्वात लवकरच देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची धुरा हाती घेणार असल्यामुळे जगभरातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना सर्वांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. विजयाची घोषणा होताच पंतप्रधान मोदींवर देश-विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.
जगभरातील बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा निवडणुकीत विजय मिळवून मोठा पक्ष बनल्याने शुभेच्छा दिल्या आहेत. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले आहेत की, “भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहोते. जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल माझे मित्र पंतप्रधान मोदी आणि एनडीएचे अभिनंदन. ते भारताला नव्या उंचीवर नेत आहेत. आपल्या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघें यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल आनंद व्यक्त करत अभिनंदन केले आहे. रानिल विक्रमसिंघें यांनीही नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, एनडीएच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेने प्रगती आणि समृद्धीवर विश्वास दाखवला आहे. श्रीलंका, आपला सर्वात जवळचा शेजारी असल्याने, भारतासोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे.”
भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले गेले होते. या दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी एक्स वर लिहिले आहे की, “२०२४ च्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि एनडीए यांचे अभिनंदन. दोन्ही देशांच्या सामायिक समृद्धीसाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.”