सिडकोच्या घरांच्या योजनेवरून विधानपरिषदेत गोंधळ – आ. प्रविण दरेकर यांचा शासनाला सवाल : “आमच्या पत्रांचं काय झालं?”

मुंबई | प्रतिनिधी – सिडकोने ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना जाहीर केल्यानंतर आज विधानपरिषदेच्या सभागृहात ही बाब चर्चेचा विषय ठरली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली. या चर्चेत भाग घेताना आमदार प्रविण दरेकर यांनी सिडकोच्या ग्राहकांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आणि एक महत्त्वाचा सवाल उपस्थित केला – “आमच्या दिलेल्या पत्रांचे काय झाले?”

दरेकर म्हणाले की, “सिडकोच्या घरांच्या प्रश्नावर मी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र दिले होते. मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर शेरा मारून ते सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी पाठवले होते. मात्र, त्यानंतर काहीच घडले नाही. हे पत्र गायब झाले का, याची चौकशी झाली पाहिजे.”

सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनांसंदर्भात सरकारकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप करत दरेकर म्हणाले की, “सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरे देण्याच्या नावाखाली फक्त जाहिरातबाजी होते, पण खरी अंमलबजावणी होत नाही. ही पद्धत आता बदलली पाहिजे.”

या मुद्द्यावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, “आ. दरेकर यांनी उपस्थित केलेल्या पत्राच्या संदर्भात योग्य ती चौकशी केली जाईल,” असे आश्वासन सभागृहात दिले.

सिडकोच्या योजनांमध्ये पारदर्शकता आणि वेळेत अंमलबजावणी यासंदर्भात वारंवार उठणारे प्रश्न पाहता, आता शासन खरोखरच कारवाई करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *