२६ मे २०२५ रोजी आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन (Acharya Atre Chowk Metro Station) येथे पावसामुळे पाणी शिरल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे मेट्रो स्टेशनवरील प्रवासी सेवा तात्काळ थांबवावी लागली. याप्रकरणी त्वरित चौकशी करण्यात आली असून, निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी आढळल्याने कंत्राटदार कंपनी डोगस-सोमा जेव्ही (DOGUS-SOMA JV) यांच्यावर रु.१०,००,०००/- (दहा लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविल्यानंतर प्राप्त झाली.
कंत्राटदार कंपनी डोगस-सोमा जेव्ही यांस पाठविलेल्या नोटीस अनुसार २६ मे २०२५ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसात आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनच्या कॉन्कोर्स लेव्हलमध्ये पाणी शिरले. ही घटना मुख्यत्वे B2 एंट्री/एक्झिट इंटरफेसवर बसवलेल्या तात्पुरत्या फायर बॅरियर सिमेंट प्रीकास्ट पॅनेल वॉलमध्ये बिघाड झाल्यामुळे घडली. बॅरियर फुटल्यामुळे पावसाचे पाणी आणि कचरा स्टेशन बॉक्समध्ये प्रवेशला, ज्यामुळे चिखल साचला आणि पाण्याचा प्रवाह प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स, अंडर क्रॉफ्ट लेव्हल, AFC सिस्टम, सिग्नलिंग, टेलिकॉम, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि कंट्रोल रूम पर्यंत पोहोचला. या पाण्यामुळे स्टेशनवरील आर्किटेक्चरल डिझाइन/सजावटीचे नुकसान झाले आणि प्रवासी सुविधांवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे तात्काळ सेवा बंद करावी लागली.
GC (General Consultant) च्या प्राथमिक तपास अहवालानुसार, कंत्राटदार कंपनीने पूर्वी EE-B3 वर एक समर्पित डिवॉटरिंग सिस्टीम बसवलेली होती. यामध्ये अनेक पंप होते, जे नियमित पाणी गळती व पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी सक्षम होते. मात्र, घटनेच्या वेळी कंत्राटदाराचा ऑपरेटर पाणी शिरत असल्यावर वेळेवर कृती करण्यात अपयशी ठरला. पंप वेळेवर सुरु न झाल्यामुळे पाणी संपूर्ण स्टेशनमध्ये पसरले. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत सीजी/चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – १ राजेश कुमार मित्तल यांनी कंत्राटदार डोगस-सोमा जेव्हीला कारणे दाखवा नोटीस पाठवली. दोष निश्चित झाल्यानंतर ₹१० लाखांचा आर्थिक दंड आकारण्यात आला. विशेष म्हणजे मेट्रो 3 च्या एकाही अधिकार्यांवर कार्रवाई करण्यात आली नाही. मेट्रो 3 तर्फे दावा करण्यात आला आहे की एक विचित्र घटना असल्याचे आढळून आले. नोंदवलेले नुकसान हे स्थापत्यशास्त्राचे आहे जे कंत्राटदाराने स्वतः दुरुस्त करून बदलले आहे. सर्व नुकसान ५ दिवसांच्या आत दुरुस्त करण्यात आले आहे.
या प्रकरणात माहिती अधिकारात माहिती मिळवणारे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, “सार्वजनिक निधीने उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पात अशा प्रकारचा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे. यामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच, पण कोट्यवधींचे नुकसानही होते. याबाबत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री तसेच मेट्रो 3 व्यवस्थापक यांस कडे तक्रार केली होती.
मुंबईतील महत्त्वाच्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पात सुरक्षेचे आणि स्थापत्यशास्त्रीय अचूकतेचे पालन आवश्यक आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासन अधिक दक्ष होणे गरजेचे आहे. सदर प्रकरण हे एक जागरूकतेचे उदाहरण ठरावे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले.