मीरा-भाईंदर : मराठी भाषिक अस्मिता मोर्च्याला परवानगी नाकारल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर पोलिस दलात मोठा बदल करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने हा आदेश ९ जुलै २०२५ रोजी जारी केला.
शासन आदेशानुसार, मधुकर पांडे यांची बदली पोलीस आयुक्त पदावरून अपर पोलीस महासंचालक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. तर निकेत कौशिक यांची बदली अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून मिरा-भाईंदर-वसई-विरारचे नवे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
मराठी अस्मिता मोर्च्यासाठी नागरिकांनी मोठी तयारी केली होती. मात्र परवानगी नाकारून पोलिसांनी अटकसत्र राबवल्याने नागरिकांत संताप पसरला. राजकीय आणि सामाजिक पातळीवर याला तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. मराठी कार्यकर्त्यांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप करत निषेध नोंदवला होता. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर टीका करत चौकशीची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीची कारवाई करत पोलीस नेतृत्वात बदल घडवून आणला आहे. निकेत कौशिक हे अनुभवी अधिकारी असून, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नियुक्तीने नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, “मराठी अस्मिता”च्या लढ्याचा प्रशासनावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. नागरिकांकडून नव्या आयुक्तांकडून निष्पक्ष, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.