राजकीय पादत्राणे बाजूला सारून सह. संघाला पुनरवैभवाचे दिवस आणू
पुणे – राज्यातील सहकारात पक्ष, जातपात नसते. पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून सहकाराच्या व संघाच्या भविष्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी, राज्यातील सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याची घोषणा भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. तसेच आम्ही सर्व सहकारी पक्ष बाजूला ठेवून सहकार ही आपली जात समजून संघाला पुनरवैभवाचे दिवस आणू, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना आ. प्रविण दरेकर म्हणाले कि, राज्य सहकारी संघाला वैभवशाली परंपरा आहे. अनेक मोठ्या धुरीणांनी संघाचे नेतृत्व केलेय. राज्य सरकारला सहकारात मार्गदर्शन करण्याची भूमिकाही याच राज्य संघाने निभावली आहे. अनेक राजकीय लोकप्रतिनिधीचा संघाशी थेट हस्ते-परहस्ते संबंध आलाय. राज्यातील लाखो सहकारी संस्थांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचे काम हा संघ करतो. परंतु मागील काळात हे वैभव कमी झालेले दिसतेय. ज्या प्रमुख उद्देशाने हा संघ चालत होता त्या उद्देशालाच हरताळ फासला जातो कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कुसाळकर यांनी विनंती केली. त्यानुसार मी या निवडणुकीत लक्ष घालण्याचे ठरवले असल्याचे दरेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, राज्यातील सहकारात पक्ष, जातपात नसते. पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून सहकाराच्या व संघाच्या भविष्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी, राज्यातील सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. एकूण १२ उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी मुंबई विभागातून ही निवडणुक लढणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सरकारच्या माध्यमातून जे प्रलंबित विषय आहेत ते सुटावे. पूर्वी राज्य सहकारी संघाला शिक्षण निधी यायचा, नंतर कायद्यात बदल करुन अनेक इन्स्टिटयूट, संस्था झाल्या. त्यामुळे मूळ शिक्षण निधी नसल्याने आर्थिक दृष्ट्याही संघाला सामोरे जावे लागले. कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी राज्य सरकारला विनंती करू. सहकाराच्या जे भल्याचे आहे, जे महाराष्ट्राच्या, राज्य सहकारी संघाच्या पुनरवैभवासाठी करावे लागेल ते आम्ही निश्चितपणे करू. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचाही आशीर्वाद सहकारी संघाच्या वाटचालीसाठी निश्चितपणे राहणार आहे. आम्ही सर्व सहकारी पक्ष बाजूला ठेवून सहकार ही आपली जात समजून संघाला पुनरवैभवाचे दिवस आणू, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी बोलताना दिला.
याप्रसंगी सहकारातील ज्येष्ठ नेते व मुंबई जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक नंदकुमार काटकर, नितीन बनकर, संचालिका जयश्री पांचाळ, राज्य सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष रामदास मोरे, मजूर सहकारी संस्थांचे संजीव कुसाळकर यांसह सहकार क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते.
सहकार पॅनलचे १२ उमेदवार
१) आ. प्रविण दरेकर – मुंबई विभागीय बोर्ड
२) संजीव कुसाळकर – इतर संस्थांमधून
३) रामदास मोरे – इतर मतदारसंघातून
४) अर्जुनराव बोरुडे – ओबीसी मतदार संघ
५) नंदकुमार काटकर – इतर मतदार संघ
६) सुनील ताटे – इतर मतदार संघ
७) नितीन बनकर – इतर मतदार संघ
८) जयश्री पांचाळ – महिला राखीव मतदारसंघ
९) विष्णू घुमरे – अनुसूचित जाती
१०) हिरामण सातकर- पुणे विभागीय जिल्हा सह. बोर्ड
११) प्रकाश दरेकर – राज्यातील शिखर संस्था
१२) अनिल गजरे – एनटी प्रवर्ग