पाचाड येथील जिजामाता वाड्याचे उर्वरित अवशेष मोजताहेत अखेरच्या घटका!  संरक्षक भिंती आणि वाड्याच्या चिरा ढासळत चालल्या! 

 

महाड. (मिलिंद माने) राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा पाचाड येथील असलेल्या राजवाड्याचे अवशेष आता अखेरच्या घटका मोजत आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेले हे ऐतिहासिक संरक्षित स्थळ शासन लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्षित होत आहे.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा राजवाडा होता. या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामाता वास्तव्यास होत्या. त्यामुळे या राजवाड्याला देखील अनमोल असे महत्त्व आहे. किल्ले रायगड पाहावयास येणारा प्रत्येक शिवभक्त पाचाड येथील राजवाड्याला आणि राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळाला भेट देऊन नतमस्तक झाल्याशिवाय परतत नाही. शेकडो वर्षानंतर देखील या वाड्याचे अवशेष कायम असले तरी गेली काही वर्षांमध्ये या राजवाड्याच्या अवशेषांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या राजवाड्याची देखभाल दुरुस्ती गेली कित्येक वर्षात झालेली नाही. खरंतर एकीकडे शासनाने रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करोड रुपये परिसरातील रस्ते किल्ल्याच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि उत्खननावर खर्च केलेले असताना या राजवाड्याच्या उभारणीकडे मात्र दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत. काही वर्षांपूर्वी याच राजवाड्याच्या शेजारी रायगड महोत्सवाच्या नावाखाली करोड रुपये खर्च करण्यात आले होते. तात्पुरत्या स्वरूपामध्ये या राजवाड्यावर आणि किल्ले रायगडावर आकर्षक वीज व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्यानंतर या राजवाड्याच्या संरक्षक भिंती आणि आतील वाड्यांच्या जोत्यावर उगवलेले गवत काढायला देखील वेळ नसल्याचे दिसून येत आहे.

राजवाड्याच्या संरक्षक भिंती पाचाड येथील पावसामध्ये सातत्याने कोसळत चालल्या आहेत. या राजवाडा परिसरामध्ये उगवणारे गवत, भिंतीवर वाढलेली रोपटी आजही जशीच्या तशीच आहे. राजवाड्याच्या आतील परिसरामध्ये असलेल्या विहिरी त्याचप्रमाणे घरांचा पाया दिवसेंदिवस ढासळू लागले आहेत. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून मुख्य रस्ता ते राजवाड्याचे प्रवेशद्वार इथपर्यंत जाण्यासाठी फक्त पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र आतील बाजूस असलेल्या वास्तूंना पुन्हा उभे करण्याबाबत कोणतेच नियोजन अद्याप झालेले नाही. या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेला लोखंडी दरवाजा देखील तात्पुरत्या स्वरूपाचा असून तो देखील कापडी चिंधीने बांधला आहे. राजवाड्याच्या परिसरामध्ये असलेल्या वास्तू नेमक्या कशा संदर्भात आहेत याबाबत कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेला फलक देखील जिजामाता वाडा असा एकेरी स्वरूपात लावण्यात आलेला आहे. याबाबत शिवप्रेमी मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या ठिकाणी करोडो रुपयांची तरतूद करून शिवसृष्टी उभी करण्यासाठी करोडो रुपये मोजून भूसंपादन करण्यात आले आहे. हे भूसंपादन करताना देखील स्थानिक शेतकऱ्यांना डावलून या धना दांडग्यांनी जमिनी खरेदी केल्या होत्या त्यांना अधिक पैसे मोजून हे संपादन करण्यात आले आहे. असे असताना हेच करोडो रुपये या राजवाड्याच्या पुनर्वऊभारणीसाठी खर्च केले असते तर आज हा वैभवशाली राजवाडा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरला असता.

राजवाड्याप्रमाणेच राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळावर देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमादरम्यान या समाधीस्थळाचा ताबा नक्की कोणाकडे आहे असा जाब स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला होता. या ठिकाणी सुरू असलेले काम अर्धवट अवस्थेत पडलेले असून बांधण्यात आलेले शौचालय देखील बंद ठेवण्यात आलेले आहे. यामुळे शासन ऐतिहासिक वास्तू जतन करण्यास का दुर्लक्ष करते असा प्रश्न शिवप्रेमी आणि पर्यटकांमधून विचारला जात आहे.

आज किल्ले रायगडावर आलो असता राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्याला भेट दिली असता दुःख झाले. प्रवेशद्वारावरील तुटक लोखंडी गेट आणि कुठेही नामफलक नाही. सगळीकडे गवत आणि रोपटी उगवलेली आहेत. नक्की पुरातत्व विभाग संवर्धन कशाचे करतं असा प्रश्न पडला आहे – शंतनु वाघमारे, पुणे

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा खरंच शेवटच्या घटका मोजतोय. करोडो रुपये इतर कामांसाठी खर्च होत आहेत. पण ज्या वास्तू जतन केल्या पाहिजेत तिकडे लक्ष दिले जात नाही. – रघुवीर देशमुख, शिवप्रेमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *