महाड (मिलिंद माने) पावसाळा सुरू झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रातून सांडपाणी वाहने हे नवीन नाही. गेली काही दिवसांपासून देशमुख कांबळे गावाच्या नाल्यातून काळे पांढरे रंगाचे गडद पाणी वाहत आहे. मात्र या सांडपाण्याची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नसल्याने या सांडपाण्याचा मूळ स्त्रोत शोधून कंपनीवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
महाड एमआयडीसी दरवर्षी प्रदूषित पाण्याच्या प्रदूषणामुळे नेहमी चर्चेत असते. सुमारे वीस वर्षांपूर्वी डर्टी थर्टी च्या यादीत समावेश असलेली ही एमआयडीसी सातत्याने झालेल्या कारवाईनंतर सुधारू लागलेली आहे. मात्र तरीदेखील काही कंपन्यांचा मूळ स्वभाव जात नसल्याने पावसाळा सुरू झाल्यानंतर परिसरातील सांडपाणी थेट नाल्याला जाऊन मिळत आहे. सांडपाणी जाणीवपूर्वक सोडले जाते की पावसाच्या पाण्यामुळे कंपनीच्या नाल्यातून बाहेर पडते याबाबत शोध घेणे गरजेचे आहे. गेली आठवडाभरापूर्वी सुदर्शन केमिकल या कंपनीच्या आवारातून हे पाणी संरक्षक भिंती तून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिक चौकशी केली असता सदर पाणी देशमुख कांबळे गावाच्या हद्दीतील कंपन्यांच्या नाल्यातून येत असल्याचे दिसून आले. या परिसरामध्ये नव्याने झालेली बिर्ला पेंट, लक्ष्मी ऑरगॅनिक, विनायल केमिकल तर पलीकडील बाजू सविता केमिकल, प्रिव्ही ऑरगॅनिक, महाराष्ट्र केमिकल, सिद्धार्थ केमिकल, श्रीहरी केमिकल अशा कंपन्या येतात. मात्र येणारे हे पाणी देशमुख कांबळे परिसरातील कंपन्यांच्या आवारातून येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीतील क्षेत्रात मागील दोन आठवड्यांपासून हे पाणी गावातून येणाऱ्या नाल्यावाटे नदीला जाऊन मिळत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही झाली असल्याचे बोलले जात आहे. तर सुदर्शन केमिकल प्रशासनाने याबाबत महाड एमआयडीसीला, आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील कळवलेले आहे. मात्र याबाबत महाड एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या धोरणावर संताप व्यक्त केला आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर कंपनीच्या आवारामध्ये पडलेली पावडर किंवा अन्य द्रव पदार्थ पावसाच्या पाण्याने बाहेर पडणे साहजिकच आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पडणारे पाणी नक्की कोणत्या कंपनीतून बाहेर पडत आहे याचा खुलासा होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी अशाच पद्धतीने रंगीत पाणी बाहेर पडत होते त्यावेळी देखील तक्रार झाल्यानंतर दोन्ही विभागांनी अशाच पद्धतीने एकमेकांवर बोट दाखवण्याचे काम केले होते.
औद्योगिक वसाहती मध्ये आठवडाभरापासून देशमुख कांबळे परिसरातील नाल्यातून रंगीत पाणी बाहेर पडत आहे मात्र यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा एमआयडीसी कोणतीच कारवाई करत नाही. या सरकारच्या काळात लोकप्रतिनिधी मस्त, जनता त्रस्त आणि अधिकारी सुस्त अशी स्थिती निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया गावातील सामाजिक कार्यकर्ते – तुकाराम देशमुख, यांनी व्यक्त केली