महाडमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पुरजन्य परिस्थिती उद्भवण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भीती

महाड – (मिलिंद माने)  मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जून महिन्यामध्ये धो धो कोसळत असून गेली दोन दिवस महाड आणि परिसराला मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले आहे. यामुळे तालुक्यातील नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मागील दोन दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे तालुक्यातील सावित्री, गांधारी, काळ या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. महाड तालुक्यातील प्रतिवर्षी उद्भवणारी पूरजन्य परिस्थिती कायम नुकसान करत असल्याने दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने पुराशी सामना करण्यासाठी तयारीनिशी सज्ज झाले आहे.

 

आपत्कालीन व्यवस्थापन देखील सज्ज झाले आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उत्खनन आणि माती भराव झाल्याने नदी बाहेर येणारे पाणी वेगवेगळ्या भागात फिरण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. आज सकाळी दस्तुरी नाका ते नातेखिंड या मार्गावर देखील पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचून राहिले होते. तर गांधार पाले परिसरात देखील नदीचे पाणी शिरल्यामुळे पूरजन्य दिसून येत होती. या पाण्यामुळे मात्र शेतीचे नुकसान झाले आहे.

महाड तालुक्यात दोन दिवसात १८९ एम एम पाऊस झाला आहे. शेजारील महाबळेश्वर, किल्ले रायगड परिसर आणि वाळण खोऱ्यामध्ये पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होत असते याचा परिणाम महाड शहराला जाणवतो. त्यामुळे प्रशासन या भागावर देखील लक्ष ठेवून आहे.

महाबळेश्वर परिसरामध्ये देखील मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने येथील पाणी मोठ्या प्रमाणावर सावित्री नदीच्या माध्यमातून शहरांमध्ये दाखल होत असल्याने यावर देखील प्रशासन लक्ष देत आहे.

अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी

हवामान खात्याने पर्जन्यवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आणि तालुक्यात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर महाड तालुक्यातील शाळा तात्काळ सोडण्यात आल्या. असल्या तरी पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास किंवा महाबळेश्वर वाळण खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्यास आजच्या सारखी परिस्थिती उद्या देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *