माझ्या राजकीय कारकिर्दीला हानी पोहोचवण्यासाठीच मोठे षड्यंत्र रचलेय निराधार, बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्याबाबत आ. दरेकरांची संपादक कोचरेकरां विरोधात तक्रार

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींची प्रवीण दरेकर यांनी घेतली भेट

 

मुंबई – टाईम्स महाराष्ट्र या वेबपोर्टलचे संपादक राजेश कोचरेकर यांनी पोर्टलवर भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्याविरोधात हेतूपरस्पर निराधार व बदनामीकरक व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओची दखल घेत आ. प्रविण दरेकर यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. माझ्या राजकीय कारकिर्दीला हानी पोहोचविण्यासाठी करण्यात आलेले हे मोठे षडयंत्र असून याची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि यात सहभागी असणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार आ. दरेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

आ. प्रविण दरेकर यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, आज १८ जून २०२५ रोजी टाइम्स महाराष्ट्र नावाच्या एका न्यूज पोर्टलने ‘प्रविण दरेकर यांचा पत्ता का कापला जाणार’ या मथळ्याखाली एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात या पोर्टलचे संपादक व समालोचक राजेश कोचरेकर कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज येथे घडलेल्या एका घटनेबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. ही घटना देवांग दवे आणि ठाकूर व्हिलेज येथील फेरीवाल्यांमध्ये सुरू असलेल्या भांडणावरून घडली होती. समालोचक राजेश कोचरेकर यांनी या घटनेचा वापर करून माझी प्रतिमा खराब करत अनेक निराधार आरोप केले आहेत. त्यांच्या व्हिडिओमध्ये, त्यांनी म्हटले आहे की माझा भाऊ प्रकाश दरेकर यांनी देवांग दवे यांना मारहाण केली. इतकेच नाही तर व्हिडिओची सुरुवात मी मुंबई जिल्हा सहकारी बँकेत घोटाळा केल्याच्या आरोपाने करण्यात आली आहे. तथापि, बँकेत असा कोणताही घोटाळा झाला नव्हता. काही वर्षांपूर्वी राजकीय वैमनस्यातून मुंबई बँकेच्या संचालकांवर आरोप लावण्यात आले होत. चौकशीअंती, तपास यंत्रणेने न्यायालयीन निर्देशानुसार मुंबई बँकेच्या सर्व संचालकांना क्लीनचिट दिली.
आज अपलोड केलेला व्हिडिओ हा नियोजित कटकारस्थान केलेला आहे. जो माझी प्रतिमा खराब करण्याच्या स्पष्ट हेतूने प्रसारित करण्यात आला होता. इतकेच नाही तर व्हिडिओमधील मजकूर इतका अपमानजनक आहे की तो महाराष्ट्रातील लोकांच्या नजरेत माझी स्वच्छ प्रतिमा मलिन करू शकतो. ज्या पद्धतीने राजेश कोचरेकर यांनी व्हिडिओ तयार केला आणि २ लाखांहून अधिक सदस्य असलेल्या टाइम्स महाराष्ट्रावर प्रसारित केला, त्यावरून असे दिसते की माझ्या राजकीय कारकिर्दीला हानी पोहोचवण्यासाठीच माझ्याविरुद्ध मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी मोठ्या निधीचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील बाबी लक्षात घेता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व राजेश कोचरेकर, टाइम्स महाराष्ट्र युट्यूब चॅनेल आणि ज्यांनी हे षडयंत्र रचले त्यांच्यावर कलम ३५३, ३५६, ३०८ आणि भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली, आयटी कायद्याच्या कलम ६६ अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असेही आ. दरेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *