महाड (मिलिंद माने) – मागील दोन दिवसांपासून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोरदार मुसळधार पावसाचा प्रकोप सुरू असून, अनेक नद्या व नाले तुडुंब भरल्याने विविध ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कराड मार्गे चिपळूणकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता बंद झाला आहे. पाटण तालुक्यातील वाजे गावाजवळील पूल पावसाच्या तडाख्याने वाहून गेला असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाजे गावाजवळील मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पाईप टाकून त्यावर रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीच्या घटना घडल्याने या पाईपची व्यवस्था वाहून गेली आणि परिणामी संपूर्ण वाहतूक खोळंबली. या ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, चिपळूण-कराड मार्गाचे गेल्या दोन वर्षांपासून रुंदीकरणाचे काम सुरू असून ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, निकृष्ट दर्जाचे काम आणि वेळेत न झालेली बांधकामे यामुळेच ही दुर्घटना घडली.
वाहतूक ठप्प झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली असून, आता कोल्हापूर–देवरुख–रत्नागिरी आणि भोर–ताम्हिणी घाट मार्गांद्वारे वाहने वळवण्यात येत आहेत. मात्र, त्यामुळे या मार्गांवरही वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनी आवश्यक असल्यासच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.