सातारा, दि. १६: “शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून, शिक्षक हे देशाच्या उज्जल भवितव्याचे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणात उत्कृष्टता साधत देश व राज्याचा नावलौकीक वाढवावा,” असे प्रेरणादायी आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोडोली (ता. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ च्या उद्घाटनप्रसंगी केले.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नव्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “मुलांनो, भरपूर अभ्यास करा, मोठे व्हा आणि देशासाठी काहीतरी करा. आपण डॉक्टर, अभियंते, अधिकारी काय होणार हे आत्तापासूनच ठरवा आणि तयारी सुरू करा.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘माझी शाळा – आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या शाळा इमारतीचे उद्घाटनही श्री. शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, पोलीस अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व
श्री. शिंदे यांनी सांगितले की, शासकीय शाळांमधून शिकून देशाचे नेते तयार झाले आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शासकीय शाळांमधून शिक्षण घेतले. आजच्या विद्यार्थ्यांनीही त्यांच्यासारखे घडण्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा, संस्कृती, साहित्य यामध्येही उत्तम कामगिरी करावी.
‘माझी शाळा – आदर्श शाळा’ उपक्रमाचे कौतुक
या उपक्रमामुळे राज्यभरातील शाळांना नवसंजीवनी मिळाल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, कोडोली शाळेतील अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर काम करत आहेत. शिक्षणाच्या पायाभरणीवर भर देत शाळांची भक्कम शैक्षणिक इमारत उभारावी, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षणाबरोबर संस्कारही महत्त्वाचे
मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात सातारा जिल्हा अग्रेसर आहे. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या प्रेरणादायी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणावरील प्रेम, संस्कारांची जाणीव आणि भावी आयुष्याची दिशा मिळाली. शाळेचे महत्त्व पटवून देणारा हा उपक्रम निश्चितच अन्य शाळांसाठी मार्गदर्शक ठरेल.