मुंबई, दि. 8: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील 250 शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनीने हाती घेतलेल्या ‘Project H2OPE’ या सामाजिक उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून कौतुक केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ह्युंदाईने सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत हा उपक्रम सुरू केला. या प्रकल्पामुळे एकूण 26,341 विद्यार्थ्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळू लागले आहे. यामुळे त्यांच्या आरोग्य आणि शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
हा उपक्रम दोन टप्प्यांत राबवण्यात आला. पहिल्या टप्प्यात 100 शाळांमध्ये पाण्याच्या सुविधा दिल्या गेल्या, तर दुसऱ्या टप्प्यात अहेरी (35 शाळा), भामरागड (14), धानोरा (32), एटापल्ली (39), कोरची (14) आणि मुलचेरा (16) अशा एकूण 150 शाळांमध्ये सुविधा पोहोचवण्यात आली.
प्रत्येक शाळेत रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) युनिट्स, जलशीतक, सबमर्सिबल पंप, बोअरवेल्स आणि सहा थरांची साठवण टाकी बसवण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धन व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारी सत्रेही घेण्यात आली.
ह्युंदाईने त्यांच्या CSV (Creating Shared Value) धोरणांतर्गत या प्रकल्पात एकूण 5.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही योजना शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचा राज्यभर विस्तार व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त
केली.