मुंबई – प्रत्येक क्षेत्रात आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. आपला कार्यकर्ता कारकून किंवा पोस्टमन आहे अशा प्रकारची ओळख होता कामा नये. तो त्याच्या कामाने लीडर असल्याचे वाटले पाहिजे. जोपर्यंत कार्यकर्ता भक्कम करत नाही तोपर्यंत अपेक्षित निकाल मिळणार नाही. येणाऱ्या काळात पक्षाच्या माध्यमातून तसे अभियान सुरु करू, असे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोदी सरकारची ११ वर्षे’ या कार्यशाळेत केले.
सदर प्रसंगी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक तावडे, माजी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, ज्येष्ठ जिल्हा महामंत्री भाभा सिंग, निखिल व्यास, नरेंद्र वर्मा, युनूस खान, महिला जिल्हाध्यक्षा योगिता पाटील, शिवानंद शेट्टी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरेकर म्हणाले की, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे शिबीर माझ्यासाठी आवडीचा विषय असतो. कुठलाही पक्ष असेल त्याचे गतिमान काम करण्याची भूमिका सर्वसामान्य कार्यकर्ता निभावत असतो. आपला कार्यकर्ता परिपक्व असला पाहिजे यासाठी अशा प्रकारची शिबीरे महत्वाची असतात. येणाऱ्या काही दिवसात आपल्याला महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काम करायचे आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचा अंतिम उद्देश पक्षाचे संघटन मजबूत होणे, जनतेत पक्षाविषयी विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे. ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी भाजपा, कमळ हा एकमेव पर्याय असला पाहिजे हा उद्देश असतो. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन काम करण्याची गरज आहे. प्रत्येक पद महत्वाचे आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, मी राज्यात सहकार आघाडीच्या माध्यमातून शेकडो संस्था उभ्या केल्यात. राज्यात महिलांच्या चार हजार सहकारी संस्था केल्या आहेत. एका संस्थेत ११ संचालक पकडले तर ४४ हजार महिला संचालक झाल्या आहेत. आगामी काळात आ.चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली या महिलांचे फेडरेशन तयार होणार आहे. ते झाल्यावर सरकारची २५ टक्के कामं सहकारी संस्थांना मिळणार आहेत. पद कुठलेही असो. पदाची गनिमा हा त्या पदावर कामं कार्यकर्ता वाढवत असतो. त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही लोकांसाठी काहीतरी कराल त्यावेळी ते तुमची आठवण काढतील. तुमचे पद प्रत्येक समाज घटकाला माहित पाहिजे, अशा अर्थाने कामं केले तर आपली ओळख निर्माण होते अन्यथा पदं येतात नी जातात.
दरेकर पुढे म्हणाले की, सुदैवाने केंद्रीय मंत्री आपले खासदार आहेत. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या बैठकांत जी २५-२५ वर्ष थकलेली कामे, अनेक विषय मार्गी लावले आहेत. आपली सत्ता केंद्रात आणि राज्यात आहे. त्या सत्तेचा उपयोग कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून केला पाहिजे. भाजपचा कार्यकर्ता प्रत्येक कार्यक्रमात लोकांना दिसला पाहिजे. जेव्हा असे होईल त्यावेळी भाजपा शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही आपल्याला पालिकेवर भगवा फडकवायचा असल्याचा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
मराठी माणसाच्या नावावर राजकारण
करणाऱ्यांना कृतीतून उत्तर दिले पाहिजे
यावेळी आ. दरेकर यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. मुंबईतील मराठी माणसासाठी बोलणाऱ्यांना आम्ही जब विचारतो तुम्ही काही केले नाहीत पण मध्यमवर्गीय मराठी माणसासाठी भाजपा नेते पुढाकार घेताहेत व मुंबईतून वसई,विरार, कसाऱ्याला जाणारा मराठी माणूस आम्ही थांबवतोय. म्हणून मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांना आपण कृतीतून उत्तर दिले पाहिजे.
सोशल मीडिया काळाची गरज
दरेकर म्हणाले की, सोशल मीडिया ही काळाची गरज आहे. जी काळाची गरज आहे ती केलीच पाहिजे. सोशल मीडियाने वेळेचा अवधी वाचतो. सोशल मीडियात वेगळी ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाचे महत्व त्यांच्या नेतृत्वातून अधोरेखित केले आहे.त्यामुळे आपल्याकडे सोशल मीडियाला पर्याय नाही. त्याचबरोबर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिन आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेले बलिदान समजून घेऊन आपण आपल्या नेत्याप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करणे, त्यांची माहिती नव्या पिढीसमोर येणेही महत्वाचे आहे. त्यांचा बलिदान दिवसही योग्य पद्धतीने करू, अशी अपेक्षाही दरेकरांनी व्यक्त केली.