महाड – (प्रतिनिधी) महाड तालुक्यात गेली काही वर्षांमध्ये सातत्याने भूस्खलन, जमिनींना भेगा पडणे, दरड कोसळणे, अशा घटना घडत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दर्डीनच्या धोका कायम आहे मात्र तरीदेखील प्रशासन अद्याप सुस्त असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यामध्ये या वर्षी देखील ७२ गावांचा समावेश दरडग्रस्त यादीमध्ये करण्यात आला आहे.
महाड तालुका हा डोंगराळ भाग असून तालुक्याचा ८० टक्के भाग दऱ्या खोऱ्यात वसलेला आहे. या सर्व भागामध्ये १९९५ सालापासून सातत्याने दरडी कोसळत आहेत. २००५ मध्ये महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर तळीये गावात देखील अशाच प्रकारे दरड कोसळली आणि जीवितहानी झाली होती. यामुळे महाड सह पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीत आले आहेत. याबाबत प्रतिवर्षी कागदोपत्री नियोजन केले जात आहे. प्रत्यक्षात या संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये अद्याप उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत.
मागील वर्षी महाड मध्ये दरडप्रवण क्षेत्रामधून भूस्खलन होण्याच्या शक्यतेने स्थलांतरित करावे लागणार आहे. मात्र अद्याप या गावांमधून तात्पुरत्या निवासस्थानांची देखील उभारणी झालेली नाही. शासनाकडे संभाव्य दरडग्रस्त भागात भूस्खलन होईल किंवा तो भाग पावसाच्या पाण्यामुळे खचेल अशी पूर्व संदेश देणारी किंवा संकेत देणारी यंत्रणा विकसित नाही. महाड तालुक्यात संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीत लोअर तुडील, नामावले कोंड, शिंगरकोंड मोरेवाडी, आंबिवली पातेरीवाडी, कोंडीवते मूळ गावठाण, सव, सोनघर, जुई बुद्रुक, चांढवे खुर्द, रोहन, वलंग, कोथेरी जंगमवाडी, माझेरी, पारमाची वाडी, कुंबळे, कोसबी, वामने, चिंभावे बौद्धवाडी, वराठी बौद्धवाडी, चोचिंदे, चोचिंदे कोंड, गोठे बुद्रुक, आदिस्ते, खैरे तर्फे तुडील, कुर्ला दंड वाडी, रावतळी मानेचीधार, मोहोत सुतारवाडी, मांडले, पिंपळकोंड, मुमुर्शी आंब्याचा कोंड, मुमुर्शी गावठाण, मुमुर्शी बौद्धवाडी, वीर गाव, वीर मराठवाडी, टोळ बुद्रुक, दासगाव भोईवाडा, तळोशी, बिरवाडी वेरखोले, करंजखोल, नडगाव काळभैरव नगर, पुनाडेवाडी, पाचाडवाडी, सांदोशी हेटकर कोंड, शेलटोळी, अंबेशिवथर, वाळण बुद्रुक, नाणे माची, कोंडीवते नवीन, हिरकणी वाडी, पाचाड परडी वाडी, वाघेरी आदिवासी वाडी, कोथेरी तांदळेकर वाडी, करंजाडी म्हस्के कोंड, नातोंडी धारेची वाडी, गोंडाळे, खर्डी, पांगारी मनवेधार, वरंध पोकळे वाडी, वरंध बौद्धवाडी, आड्राई, वाळण झोळीचा कोंड,वाळण केतकीचा कोंड, भीवघर, पिंपळवाडी, रुपवली, निगडे, बारसगाव, कोथेरी, ओवळे, खरवली, तळीये असून या ७२ गावातील हजारो नागरिकांना निवारा शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करावे लागणार आहे.
यावर्षी १० मे पासूनच पावसाळा सुरवात झाली आहे. त्यातच किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीत प्रशासन गुंतले आहे. यामुळे मान्सूनपूर्व कामे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये अद्याप कोणत्याच उपाययोजना झालेल्या नाहीत. या गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. शासकीय पातळीवर नागरिकांना स्थलांतर करणे, स्थलांतर करण्यासाठी निवारा व्यवस्था, महाड शहरात पूरपरीस्थिती लागणारी बचाव यंत्रणा, संपर्क साधनांची उपाययोजना, बोटींची व्यवस्था पूरपरिस्थितीत दूरध्वनी यंत्रणा अशा सुविधा अद्याप कागदावरच आहेत. महाड तालुक्यातील महसूल यंत्रणा व आपत्ती निवारण यंत्रणा पावसाळा तोंडावर आला असताना शासकीय अधिकारी देखील सुस्त झोपी गेले आहेत. धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास शाळा, समाजमंदिर, मंदिर, अंगणवाडी अशाठिकाणी या नागरिकांची ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल असे महाडचे निवासी नायक तहसीलदार . महेश शितोळे यांनी सांगितले
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा संपूर्ण पावसाळ्यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी आणि इतर महसूल कर्मचाऱ्यांनी यांना दिलेल्या ठिकाणीच वास्तव्य करायचे आहे मात्र तक्रार आल्यास कारवाई केली जाईल असेही तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले.