रायगड किल्ल्यावरील २४ घरे व ५६ दुकाने अतिक्रमणमुक्त होणार? पुरातत्व विभागाची नोटिसा, ७ दिवसांची मुदत

 

महाड (मिलिंद माने) – कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर आता रायगड किल्ल्यावर देखील केंद्रीय पुरातत्व विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील २४ निवासी घरे व ५६ दुकाने अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

 

वन विभागाच्या नोटिशीनंतर आता केंद्रीय पुरातत्व विभागाने देखील रहिवाशांना सात दिवसांची नोटीस बजावली आहे. या मुदतीत घरे आणि स्टॉल्स रिकामे न केल्यास, ती बेकायदेशीर बांधकामं म्हणून काढून टाकली जातील, असा स्पष्ट इशारा विभागाने दिला आहे.

 

पार्श्वभूमी – विशाळगडापासून रायगडपर्यंत

 

मागील वर्षी विशाळगड अतिक्रमण प्रकरणानंतर झालेल्या वादंगामुळे राज्यभरात आंदोलनाची लाट उसळली होती. त्यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्यातील सर्व ऐतिहासिक किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून रायगडावर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

 

रायगडवरील अतिक्रमणाचे स्वरूप

 

रायगड किल्ल्यावर धनगर समाजाचे २४ निवासी घरे असून, अनेक कुटुंबांनी महादरवाजा, होळीच्या माळा, हत्ती तलाव ते जगदीश्वर मंदिरापर्यंत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, झुणका भाकर केंद्र, शीतपेय विक्रीचे स्टॉल्स, पाण्याच्या बाटल्या विक्रीचे स्टॉल्स उभारले आहेत. पुरातत्व विभागाच्या मते ही सर्व बांधकामं अनधिकृत असून, ती प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष कायदा, १९५८ व AMASR नियम १९५९ अंतर्गत बेकायदेशीर ठरतात.

 

नोटिशींची कायदेशीर चौकट

 

कायद्यानुसार कोणत्याही संरक्षित स्मारक क्षेत्रात कोणतेही बांधकाम, दुरुस्ती, पुनर्बांधणी परवानगीशिवाय करता येत नाही. १६ जून १९९२ च्या अधिसूचनेनुसार रायगड हा संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे येथे करण्यात आलेली घरे आणि दुकाने बेकायदेशीर ठरतात.

 

यासंदर्भातील नोटिशा रा.पी. दिवेकर, संकलन सहाय्यक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, रायगड उपवृत्त कार्यालय यांच्या स्वाक्षरीने बजावण्यात आल्या आहेत. नोटिशांच्या प्रती रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महाड तहसीलदार, सहाय्यक वनसंरक्षक, रोहा पोलीस निरीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.

 

रायगडवरील अतिक्रमणाची यादी

 

निवासी घरे (२४)

 

ऐतिहासिक बाजारपेठेजवळील १३ घरे

 

जगदीश्वर मंदिराजवळील ८ घरे

 

मज्जिद मोर्चा जवळील २ घरे

 

वासुरेखिंड जवळील १ घर

 

 

स्टॉल्स व दुकाने (५६)

 

समाधी स्थळ ते बाजारपेठ (१६ स्टॉल्स)

 

हत्ती तलाव ते महादरवाजा (७ स्टॉल्स)

 

महादरवाजा ते चित्त दरवाजा (३१ स्टॉल्स)

 

 

(तपशीलवार नावांची यादी लेखाच्या तळाशी दिली आहे.)

 

पुढील टप्पे

 

रायगडवरील रहिवाशांनी व स्टॉलधारकांनी जर ही अतिक्रमणं सात दिवसांच्या आत स्वतःहून काढून टाकली नाहीत, तर AMASR नियम ३९ अंतर्गत शिक्षेस पात्र ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे की ही मोहीम नियोजनपूर्वक व कायदेशीर प्रक्रियेनुसार राबवली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *