महाड : (मिलिंद माने) छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी. असणाऱ्या किल्ले रायगडावर येत्या ६ जून रोजी तारखेनुसार व ९ जून रोजी तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना करण्या दृष्टीने दिनांक २८ व २९ या दोन्ही दिवशी किल्ले रायगडवर जाणारा पायरीमार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २२ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
सन २०२३ मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान महादरवाजा खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरून पडलेल्या दरडीमुळे एका शिवभक्ताला आपला जीव गमवावा लागला होता तसेच इतर छोट्या-मोठ्या झालेल्या दुर्घटना याचा सारासार विचार करून येणाऱ्या शिवभक्तां च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील मोठे दगड,धोंडे बाजूला करणे आवश्यक असल्याने हा बंदीचा आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या पाऊलवाटा वर सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या गिर्यारोहकांना पाचारण करण्यात येणार असून दिनांक २८ व २९ मे रोजी त्यांच्यामार्फत ही मोहीम राबवण्यात येणारआहे. सदर मोहिमेदरम्यान शिवभक्त व पर्यटकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी या दोन्ही दिवशी पायरी मार्ग पूर्णपणे बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. यादरम्यान चित्त दरवाजा, नाणेदरवाजा, होळीचामाळ, शिरकाई देवी मंदिर परिसर, इत्यादी ठिकाणी पोलीस बंदोबस्त राखण्याच्या सूचना देखील परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत. या सुरक्षात्मक उपाययोजनांच्या मोहिमेदरम्यान रोपवे व्यवस्था संपूर्णपणे सुरू राहणार असल्याचे परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.