स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाची छत्रपती संभाजीनगर येथे बैठक संपन्न; अभ्यास गटाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकरांचे बैठकीत मार्गदर्शन

संभाजीनगर – राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाची बैठक येथील विभागीय आयुक्त कार्यालयालयात पार पडली. या बैठकीत अभ्यासगटाने छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, सिडको आणि अन्य नियोजन प्राधिकरणाचा आढावा घेतला.

या बैठकीला सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक राजेश लव्हेकर, उपायुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, सिडको, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, हिंगोली, परभणीचे उपजिल्हाधिकारी, सर्व सह संचालक, नगर रचना, विभागाचे सह संचालक, नगर रचना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड – वाघाळा, जालना, हिंगोली या महापालिकेचे अधिकारी, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर येथील हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष व अन्य अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

यावेळी स्वयंपुनर्विकासातील अडचणी, विकास नियंत्रण नियमावलीत करावयाचा अपेक्षित बदल, शासकीय जमिनींसंदर्भात करावयाचे नियमातील बदल, एक खिडकी योजना, वाढीव चटईक्षेत्र यासंदर्भातील विविध सूचना अधिकाऱ्यांनी अभ्यासगटासमोर मांडल्या.

या बैठकीत बोलताना दरेकर म्हणाले की, गृहनिर्माण संस्थांना स्वयंपुनर्विकासासाठी कर्ज उपलब्ध करून देता येईल. शासन स्तरावर त्याचेही नियोजन सुरु आहे. ज्या वेगवेगळ्या परवानग्या असतात त्या परवानग्यासंदर्भात वन विंडो करणे, अनेक सवलती देणे, कायद्यात बदल करणे यासाठी येणाऱ्या हौसिंग पॉलिसीत या अभ्यास गटाच्या अहवालचा उपयोग केला जाणार आहे. ही स्वयंपुनर्विकासाची चळवळ राज्यभर यशस्वी होऊ शकते. हा विषय अत्यंत महत्वाचा,संवेदनशील आहे. त्यामुळे आपल्या लेखी सूचना देखील अभ्यासगटाला पाठवाव्यात, स्वयंपूनर्विकासासाठी पुढे याणाऱ्या संस्थांना आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, अशा सूचनाही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *