३५२ शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून निर्माण झाला वाद; तिथी नुसार शिवराज्याभिषेक साजरा करणाऱ्या संस्थेकडून टी शर्ट वर तारीख तिथीचा वादग्रस्त संदेश
“मराठी तिथी म्हणजे मराठी अस्मिता…. “इंग्रजी तारीख म्हणजे केवळ Adjustment”
महाड -( मिलिंद माने ) रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून व किल्ल्यावरील धनगर समाजाची घरे अनधिकृत ठरवून ती काढण्याच्या नोटिसी देण्याचा वाद सुरु असतानाच आता तारीख व तिथीवरून नवा वाद उत्पन्न होणार असल्याचे दिसत असून ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा नव्यावादात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करणाऱ्या संस्थेकडून काढण्यात आलेल्या टी शर्ट वर मराठी अस्मिता या विषयातून थेट तारीख तिथीचा वाद निर्माण होण्याची शक्यात आहे. याबाबत स्वतः संभाजीराजे यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड वर शिवराज्याभिषेक सोहळा, शिवजयंती, शिव पुण्यतिथी याच बरोबर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन व १ मे महाराष्ट्र दिन असे ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम पार पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर दरवर्षी सर्वच ऋतूत किल्ले रायगड पाहण्यासाठी लाखो पर्यटकांसह शिवभक्त हजेरी लावतात. काही जण पायरी मार्गाने पायी जातात तर ज्यांना पायी चालणे शक्य नाही ते रोपवेच्या माध्यमातून किल्ले किल्ल्यावर जाऊन किल्ले रायगड चे ऐतिहासिक सौंदर्य पाहतात. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर असलेल्या निवासी घरे व दुकाने केंद्रीय पुरातत्व विभाग व वन विभागाने अनधिकृत ठरवले आहेत. हा वाद प्रलंबित असताना किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळ असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा वाद देखील चव्हाट्यावर आला असताना ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळा हा तारखेप्रमाणे ६ जून तर तिथीप्रमाणे ९ जून अशा दोन्ही वेळा मोठ्या प्रमाणात व जल्लोषात साजरा केला जातो या दोन्ही कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेसहित राज्य सरकार या कार्यक्रमांना अनुदान देत असते.
कोकण कडा मित्र मंडळाच्या बॅनर वरून वाद ?
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवशके या दिवशी ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना त्यासाठी कोकण कडा मित्र मंडळाने छापलेल्या टी-शर्ट वर असे उल्लेखित केले आहे की, “मराठी तिथी म्हणजे मराठी अस्मिता…. “इंग्रजी तारीख म्हणजे केवळ Adjustment” अशा प्रकारचे टी-शर्ट छापले आहेत या टी-शर्ट वर असणाऱ्या मजकुरावरून महाराष्ट्रात पुन्हा तिथी व तारखे च्या राज्याभिषेक सोहळ्यावरून नवा वाद उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचे ऐकिवात आले आहे.